मुंबई : मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी दर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येतो. मात्र, येत्या रविवारी मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही. त्यामुळे या दिवशी घराबाहेर पडणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर, रविवारी दिवसा ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री मेगाब्लॉक असेल.
ट्रान्सहार्बर मार्ग
कुठे : ठाणे – वाशी / नेरुळ अप आणि डाऊन. कधी : सकाळी १०.३५ ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत ठाणे ते वाशी / नेरुळ / पनवेल अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. तर, रविवार मुख्य मार्गिकेवर आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नसेल.
पश्चिम रेल्वे
कुठे : बोरिवली ते गोरेगाव. कधी : रात्री ११.४५ ते पहाटे ४.१५ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत बोरिवली ते गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल बोरिवली ते गोरेगाव स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. ब्लॉक कालावधीत काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतील.
मध्य रेल्वेवर पायाभूत कामांसाठी ‘पॉवरब्लॉक’
मुंबई : मध्य रेल्वेवरील कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांदरम्यान ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर’ प्रकल्पासाठी गर्डर टाकण्याचे काम कोपर स्थानकात सुरू आहे. या कामानिमित्त शनिवारी मध्यरात्री १ वाजल्यापासून ते रविवारी पहाटे ४.३० वाजेपर्यंत सीएसएमटी – कल्याण, कसारा विभागात पॉवरब्लॉक घेण्यात येणार आहे. ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर’ प्रकल्पाच्या दुसऱ्या ओपन वेब गर्डरच्या उभारणीसाठी शनिवारी मध्यरात्री कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धिम्या व जलद मार्गावर, सहाव्या आणि पाचव्या मार्गावर ब्लॉक असणार आहे. याचदरम्यान दिवा – ठाणे विभागातील दिवा रोड उड्डाणपुलाचे गर्डर टाकण्यासाठी मध्यरात्री शनिवारी १.३० ते रविवारी पहाटे ४.३० वाजेपर्यंत अप आणि डाऊन धिम्या आणि जलद मार्गावर ब्लॉक आहे. टिटवाळा येथे उड्डाणपुलासाठी गर्डर उभारण्याचे काम मध्यरात्री १ ते पहाटे ४.४५ वाजेपर्यंत ब्लॉकमध्ये करण्यात येणार आहे.