मुंबई : बनावट बियाणांच्या प्रश्नावर विधानसभेत मंगळवारी उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेवर ५० मिनीटे चर्चा होवूनही सदस्यांचे समाधान झाले नाही. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे उपस्थित नसल्याने कृषी राज्यमंत्री आशिष जैयस्वाल यांना संतप्त सदस्यांच्या प्रश्नांच्या फैरींना तोंड द्यावे लागले. वादळी चर्चा झालेली सदर लक्षवेधी अखेर राखून ठेवण्याची नामुष्की सरकारवर ओढावली.
भाजपचे राजेश बकाने यांनी वर्धा जिल्ह्यात बनावट बियाणे विक्रीसंदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती. वरुण सीडस् कंपनीचे गणेश सोयाबीन बियाणे न उगवल्याने हजारो शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला असून कंपनीवर कारवाईची त्यांनी मागणी केली. सभागृहात यावेळी कृषी राज्यमंत्री आशिष जैयस्वाल होते. इतर सदस्यांनी त्यांच्या जिल्ह्यातही बनावट बियाणे विक्री होत असून जिल्हा कृषी अधिकारी आणि बियाणे कंपन्यांचे संगनमत असल्याचे आरोप केले.
प्रकरण तपासून कारवाई केली जाईल, असे उत्तर जैयस्वाल यांनी दिले. मात्र संबंधित कृषी अधिकाऱ्यास निलंबीत करण्याची सदस्यांनी मागणी लावून धरली. दोषी कृषी अधिकाऱ्याचे नाव सांगा, असा प्रतिप्रश्न जैयस्वाल यांनी केला. त्यावर वर्धा जिल्हा कृषी अधिकारी तोटावार यांचे नाव पुढे आले. याप्रकरणी शेतकऱ्यांच्या तक्रारी नाहीत, असे उत्तर जैयस्वाल यांनी दिले. त्याला सदस्यांनी पुन्हा आक्षेप घेतला. कृषी विभागाकडे ३२८ तक्रारी आल्याचे प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितले. या चर्चेत हरिष पिंपळे, समीर कुणावार, कैलास पाटील हे सदस्य आघाडीवर होते.
अखेर भाजपचे प्रतोद रणधीर सावरकर यांनी चर्चेत हस्तक्षेप केला. याप्रकरणी सदस्यांच्या भावना तीव्र असून मंत्र्यांनी कारवाईची घोषणा करण्याची सावरकर यांनी मागणी केली. याप्रकरणी सभागृहात निवेदन करण्याचे जैयस्वाल यांनी जाहीर केले. त्यावर पुन्हा गोंधळ उडाला. माजी मंत्री संजय कुटे यांनी हस्तक्षेप करत सोमवारी याप्रकरणी बैठक घेवून विषय संपवण्याचे आवाहन केले. कुटेंचा तोडगाही सदस्यांना मान्य झाला नाही.
सदस्य ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. लक्षवेधीवर ५० मिनीटे चर्चा होवूनही सदस्यांना उत्तर मिळत नव्हते. यावेळी तालिका सभापतीपदी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभिजीत पाटील होते. सदस्यांना समाधानकारक उत्तर द्यावे, असे मंत्र्यांना ते वारंवार आवाहान करत होते.
चर्चेवेळी सभागृहातील बहुतांश सदस्य उभे होते. सगळेच बोलण्याचा प्रयत्न करत होतो. अनेकांनी आपली आसने सोडलेली होती. गोंधळ वाढत गेल्याने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सभागृहात आले. सदर लक्षवेधी राखून ठेवण्याची त्यांनी विनंती केली.