मुंबई : राज्यात ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागात पावसाचे प्रमाण सरासरीइतके राहील. तर, कोकण, खानदेशात सरासरी किंवा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. दरम्यान, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील सर्वच भागात पावसाचे प्रमाण कमी राहील. त्यानंतर साधारण दुसऱ्या आठवड्यानंतर पावसाचे प्रमाण वाढेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात म्हणजेच मोसमी पावसाच्या दुसऱ्या टप्प्यात सरासरीच्या १०६ टक्के पावसाचा अंदाज आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्यूंजय मोहपात्रा यांनी गुरुवारी मोसमी पावसाच्या दुसऱ्या टप्प्यातील पावसाचा अंदाज जाहीर केला.या दोन महिन्यांत कोकण किनारपट्टी , मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात सरासरी किंवा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर सरासरीइतकाच पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, विदर्भात ऑगस्ट महिन्यात पाऊस कमी राहील. त्याचबरोबर मराठवाड्यातही पावसाचे प्रमाण तुलनेने कमी असेल. मध्य महाराष्ट्रातही पावासची सामान्य स्थिती असेल. तर, पालघर, ठाणे, नाशिक, अहिल्यानगर, नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यांत सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमीच

हवामान विभागाने ऑगस्ट महिन्यात देशात सरासरीच्या ९४ ते १०६ टक्के पावसाची शक्यता वर्तवली आहे. मात्र, महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि ओडिशा या भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. तर, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरियाणा, पंजाब, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे.

मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक

जुलै महिन्यात सुरुवातीपासून राज्यात सर्वत्र पावसाने ओढ दिली होती. त्यानंतर साधारण २० जुलैपासून राज्यात पाऊस सक्रिय झाला होता. या कालावधीत विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळला. दरम्यान , जुलै महिन्यात राज्यात सरासरी ३४२.२ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. यंदा ३२७.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच राज्यात १ टक्के जास्त पावसाची नोंद झाली. याचबरोबर राज्यात जुलै महिन्यात मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस नोंदला गेला. येथे १ ते ३१ जुलैपर्यंत ३८७.२ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. यंदा ४२४.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच मध्य महाराष्ट्रात १० टक्के अधिक पावसाची नोंद झाली. याचबरोबर कोकणात सामान्य पावसाची नोंद झाली आहे. येथे १ ते ३१ जुलैपर्यंत १७५५ मिमी पाऊस अपेक्षित होते. या कालावधीत येथे १७७५. ८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच विदर्भातही अधिक पावसाची नोंद झाली आहे. येथे ५२९.८ मिमी पाऊस नोंदला गेला आहे. साधारण विदर्भात जुलै महिन्यात ४८४.७ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. दरम्यान, मराठवाड्यात पावसाची तूट आहे. येथे १ ते ३१ जुलैपर्यंत ३०५.१ मिमी पाऊस अपेक्षित असतो. यंदा येथे २४६.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच १९ टक्के पावसाची तूट आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईत सरासरीपेक्षा कमीच

गतवर्षीच्या तुलनेत मुंबईत यंदा जुलै महिन्यात पावसाची तूट आहे. जुलै महिन्यात कुलाबा केंद्रात साधारण ७३४.१ मिमी तर, सांताक्रूझ केंद्रात ८५५.७ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. यंदा १ ते ३१ जुलैपर्यंत हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ३७८.४ मिमी तर, सांताक्रूझ केंद्रात ७९०.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच कुलाबा केंद्रात ३५५.७ मिमी तर, सांताक्रूझ केंद्रात ६५.१ मिमी कमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी जुलै महिन्यात दोन्ही केंद्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली होती. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात जुलै २०२४ मध्ये १४०१.८ मिमी तर, सांताक्रूझ केंद्रात १७०२.८ मिमी पाऊस नोंदला गेला होता. याआधी २००२ मध्ये जुलै महिन्यात सर्वाधिक कमी पावसाची नोंद झाली होती. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात जुलै २०२२ मध्ये १०३.५ मिमी तर , सांताक्रूझ केंद्रात १०२.८ मिमी पावसाची नोंद झाली होती.