मुंबई : मोसमी पाऊस पुढील चार ते पाच दिवसांत केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. र्नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असल्यामुळे मोसमी पाऊस वेळेच्या आधीच केरळमध्ये दाखल होईल, असेही भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, मंगळवारी जोरदार पडलेल्या वळवाच्या पावसाने मुंबईला झोडपून काढले.त्याचबरोबर मोसमी वारे या चार पाच दिवसांत दक्षिण अरबी समुद्राचा आणखी काही भाग, लक्षद्वीपचा काही भाग, केरळ आणि तामिळनाडूचा काही भाग, बंगाल उपसागराचा काही भाग आणि ईशान्येकडील राज्यांचा काही भाग तसेच मालदीव आणि कोमोरिनचा उरलेला भाग र्नैऋत्य मोसमी वारे व्यपतील अशीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. मोसमी वाऱ्यांनी सोमवारपर्यंत श्रीलंकेचा बहुतांश भाग व्यापला होता.

तसेच, दक्षिण अरबी समुद्राच्या आणखी काही भागात वाटचाल केली होती. मालदीव आणि कोमोरिनच्या आणि बंगाल उपसागराच्या काही भागातही मोसमी वाऱ्यांनी मजल मारली होती. मात्र, मंगळवारी मोसमी वारे त्याच जागेवर थिजले होते.दरम्यान, हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, यंदा र्नैऋत्य मोसमी वारे २७ मे रोजी केरळमध्ये दाखल होतील. गोव्यामध्ये १ जूनपर्यंत, तर महाराष्ट्रात मुंबई येथे ५ जूनपर्यंत मोसमी वारे दाखल होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी १९ मे रोजी अंदमान-निकोबार बेटांवर र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी धडक दिली होती. त्यानंतर नियोजित वेळेच्या म्हणजेच ३० मे रोजी पाऊस केरळमध्ये दाखल झाला होता.

दरम्यान, केरळमध्ये मोसमी पाऊस सामान्यत: १ जूनच्या आसपास दाखल होतो. भारतीय हवमान विभागाच्या तारखेनुसार म्हणजेच १ जूनपूर्वी पाच दिवस आदी किंवा नंतर पावसाचे आगमन होऊ शकते (म्हणजे २७ मे ते ५ जूनदरम्यान) त्यानंतर पाऊस हळूहळू देशभर पसरतो.

मुंबईत पावसाची हजेरी

मुंबई शहर तसेच उपनगरात मंगळवारी सायंकाळनंतर पावसाने हजेरी लावली. यावेळी विजांच्या कडकडाटासह शहरात हलक्या सरी बरसल्या. तर घाटकोपर, विक्रोळी, बोरिवली, कांदिवली, जोगेश्वरी तसेच विरार परिसरात मुसळधार पाऊस कोसळला. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.

राज्यात मुसळधारेचा इशारा

मुंबईसह, दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बुधवार आणि गुरुवार हे दोन्ही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यावेळी काही भागात जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. तर काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले.

पश्चिम उपनगरात एक तासात मुसळधार

मंगळवारी संध्याकाळी मुंबईत पडलेल्या जोरदार पावसाने पश्चिम उपनगराला झोडपून काढले. अंधेरी जोगेश्वरी परिसरात एका तासात ६० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे अंधेरी भुयारी मार्गात पाणी साचल्यामुळे भुयारी मार्ग वाहतूक पोलिसांनी बंद केला. त्यामुळे अंधेरी परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. थोडासा पाऊस पडला की अंधेरी सबवे मध्ये पाणी साचते. त्यानुसार वळवाच्या पावसातच हा सबवे पाण्याखाली गेला आहे. पावसाळ्यात अंधेरी सबवेमध्ये पाणी साचू नये म्हणून पालिकेने हाती घेतलेली कामे रखडल्यामुळे या पावसाळ्यातही अंधेरी सबवे वारंवार बंद करावा लागणार आहे.

दरड कोसळून कोकण रेल्वे विस्कळीत

रत्नागिरी जिल्ह्यातील पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. वेरवली ते विलवडे रेल्वे स्थानकादरम्यान दरड कोसळून कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे मार्गावरील स्थानकांवर गाड्या थांबवून ठेवण्यात आल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. रेल्वे प्रशासनाने दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पावसामुळे लोकल सेवा विस्कळीत

मंगळवारी रात्री मुंबई शहर आणि उपनगरांत रिमझिम पावसाने हजेरी लावली. रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस पडण्यास सुरुवात झाल्याने, लोकल सेवा विस्कळीत झाली. पूर्व आणि पश्चिम उपनगरांत पावसाचा जोर वाढल्याने, लोकल सेवा धिम्या गतीने मार्गस्थ होत होती. त्यामुळे प्रवाशांना परतीचा प्रवास करण्यास प्रचंड उशीर झाला. ठाणे, मुलुंड, विक्रोळी, घाटकोपर, दादर, अंधेरी, कांदिवली, बोरिवली या भागांत पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे लोकल सेवा खोळंबली. अनेक लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. परिणामी लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी प्रचंड झालेली होती.