मुंबई : मुंबई आणि बदलापूरला जोडणाऱ्या कांजूरमार्ग – बदलापूर मेट्रो १४ मार्गिकेच्या बांधकामाची निविदा अंतिम करून लवकरात लवकर या मार्गिकेच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) नियोजन होते. मात्र मेट्रो १४ मार्गिकेच्या बांधकामांसाठी जारी केलेल्या निविदांना प्रतिसादच न मिळाल्याने आता नव्याने निविदा काढण्याची वेळ एमएमआरडीएवर आली आहे. या मार्गिकेच्या कामासाठी आता नव्याने निविदा काढण्यात येणार असून यासाठी आणखी वेळ लागणार असल्याने काम लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.

एमएमआरडीएने सध्या सात मेट्रो मार्गिकांची कामे हाती घेतली असून आणखी दोन मेट्रो मार्गिकांच्या कामांना लवकरच सुरुवात होणार आहे. बदलापूरवासियांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न केव्हा पूर्ण होणार असा प्रश्न होता. मेट्रो १४ मार्गिकेचे काम केव्हा सुरू होणार आणि ही मार्गिका केव्हा सेवेत दाखल होणार अशीही विचारणा होत होती. त्यानुसार एमएमआरडीएने मेट्रो १४ मार्गिकाही मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आणि या मार्गिकेच्या बांधकामासाठी मे महिन्यात निविदा प्रसिद्ध केल्या.

दरम्यान, वर्सोवा – घाटकोपर मेट्रो १, मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो ८ प्रमाणे सार्वजनिक – खासगी सहभागातून या मार्गिकेचे काम केले जाणार आहे. त्यामुळे सार्वजनिक – खासगी सहभागातून मार्गिकेचे काम करण्यासाठी एमएमआरडीएकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. या निविदेबाबत एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी निविदेला प्रतिसादच मिळाला नसल्याची माहिती दिली.

एकही निविदा सादर झालेली नाही. त्यामुळे आता नव्याने निविदा काढण्यात येणार असल्याचेही या अधिकाऱ्यांनी सांगितले. मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी आतापर्यंत चागंला प्रतिसाद मिळाला असताना मेट्रो १४ मार्गिकेला प्रतिसाद का नाही, त्याबाबत विचारणा केली असता अधिकाऱ्यांनी याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. मात्र लवकरच नव्याने निविदा काढण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. आता नव्याने निविदा प्रक्रिया राबविली जाणार असल्याने या मार्गिकेचे काम सुरू होण्यास आणखी काही महिने जाणार आहेत. दरम्यान, ही मार्गिका सार्वजनिक – खासगी सहभागातून राबविण्यात येत असल्याने निविदेला प्रतिसाद मिळाला नाही का असाही प्रश्न आहे. मेट्रो १ मार्गिका सार्वजनिक – खासगी सहभागातून उभारण्यात आली असून ही मार्गिका तोट्यात सुरू असून या मार्गिकेचे संचलन करणाऱ्या कंपनीवर कर्जाचा डोंगर आहे. त्यामुळे ही मार्गिका एमएमआरडीएने अधिग्रहीत करण्याची विनंती कंपनीकडून करण्यात आली होती. मात्र एमएमआरडीएने मेट्रो १ मार्गिका अधिग्रहीत करण्यास स्पष्ट नकार दिला. या सर्व बाबी लक्षात घेता सार्वजनिक – खासगी सहभागातून मेट्रो मार्गिका उभारून तिचे संचलन करण्याचा प्रयोग बाद ठरल्याची चर्चा

अशी आहे मेट्रो १४ मार्गिका कांजूरमार्ग – बदलापूर ही मार्गिका ३९ किमी लांबीची असून यात १५ मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. कांजूरमार्ग – घणसोलीदरम्यान ही मार्गिका भुयारी असणार आहे. तर घणसोली – बदलापूरदम्यान ही मार्गिका उन्नत असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ३९ किमी लांबीच्या मार्गिकेपैकी ४.३८ किमीची मार्गिका पारसिक हिल भागातून जाणार आहे. तर ५.७ किमी लांबीची मार्गिका ठाणे खाडी परिसरातून जाणार आहे. मेट्रो १४ मार्गिकेसाठी १८ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.