२० टक्के योजनेतील घरांसाठी चुरस, ५६५ घरांसाठी १ लाख ४६ हजार अर्जदार
लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५ हजार २८५ घरांसह ७७ भूखंडांच्या विक्रीसाठी शनिवारी सोडत काढण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातील डाॅ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात शनिवारी सकाळी ११ वाजता सोडतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या सोडतीत एक लाख ५८ हजार ४२४ अर्जदार सहभागी होणार आहेत. त्यामुळे शनिवारी कोणाचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सोडतीमधील ५ हजार २८५ पैकी २० टक्के सर्वसमावेश योजनेतील ५६५ घरांसाठी सर्वाधिक चुरस होणार आहे. या ५६५ घरांसाठी एक लाख ४६ हजारांहून अधिक अर्ज (एकूण अर्जांच्या ९३ टक्के) दाखल झाले आहेत. मात्र त्याच वेळी एकात्मिक गृहनिर्माण आणि म्हाडा योजनेतील घरांना अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे.
कोकण मंडळाने ५ हजार २८५ घरांसह ७७ भूखंडांच्या संगणकीय सोडतीसाठी जुलैपासून नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू केली होती. या प्रक्रियेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने अर्जविक्री-स्वीकृतीला दोन वेळा मुदतवाढ देण्याची वेळ मंडळावर आली. त्यामुळे सोडत दोन वेळा लांबणीवर पडली. तर नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जांची प्रारुप यादी प्रसिद्ध करण्यास विलंब झाल्याने सोडतीचा मुहूर्त पुन्हा चुकला आणि सोडत तिसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली.
अखेर आता मात्र शनिवारी सोडत काढण्यात येणार असून दीड लाखांहून अधिक अर्जदारांचे डोळे सोडतीकडे लागले आहेत. ५ हजार २८५ घरे आणि ७७ भूखंडांसाठी एक लाख ८४ हजार ९९४ अर्ज आले होते. त्यापैकी एक लाख ५८हजारांहून अधिक अर्जदारांनी अनामत रक्कमेसह अर्ज दाखल होते. त्यानुसार एक लाख ५८ हजार ४२४ अर्जदार पात्र ठरले असून हे अर्जदार शनिवारच्या सोडतीत सहभागी होणार आहेत. या अर्जदारांपैकी कोणाचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होते हे शनिवारी स्पष्ट होईल.
काही अर्जदारांना शनिवारी सोडतीसाठी कार्यक्रमस्थळी उपस्थित राहता येणार आहे. मात्र ज्यांना कार्यक्रमस्थळी उपस्थित राहता येणार नाही, त्यांना वेबकास्टिंगच्या माध्यमातून https://youtube.com/live/K9bX1SXAESQ?feature=share या लिंकवर व म्हाडाचे अधिकृत फेसबूक https://www.facebook.com/mhadaofficial आणि https://www.youtube.com/@MHADAOFFICIAL पेजवर सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण बघण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. विजेत्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर सायंकाळी ६.०० नंतर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच विजेत्या अर्जदारांना एसएमएसद्वारेही विजेता ठरल्याबाबतच संदेश त्यांनी अर्जासोबत नोंद केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर तात्काळ प्राप्त होणार आहे, अशी माहिती कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली.