houses in Chitalsar Rates मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या २००० सालातील एका योजनेतील १५६ अर्जदारांना २५ वर्षांनंतर घरे देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यासाठी चितळसर मानपाडा येथील बहुमजली इमारतीतील १५६ घरे या अर्जदारांसाठी राखीव ठेवण्यात आली असून ही घरे या अर्जदाराना वितरीत करण्यात येणार आहेत. मात्र या घरांसाठी ५१ लाख ते ५२ लाख रुपये अशा किंमती आकारण्यात आल्या असून या किंमती भरमसाठ आहेत, आम्हाला परवडणाऱ्या नाहीत असा आक्षेप नोदवत अर्जदारांनी किंमती कमी करण्याची मागणी म्हाडा आणि मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. पण ही मागणी डावलून त्यांना ५१ लाख ते ५२ लाखांत घरे देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यानुसार १० सप्टेंबरपर्यंत अर्जदारांनी लेखी संमतीपत्र सादर करावे, असे पत्र मंडळाने प्रसिद्ध केले आहे. समंतीपत्रासाठी ही अंतिम मुदत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे संमतीपत्र सादर न करणाऱ्या अर्जदारांचा घराचा हक्क रद्द होण्याची शक्यता आहे.
कोकण मंडळाने २००० मध्ये ४५० चौरस फुटांच्या भूखंडांच्या विक्रीसाठी अर्ज मागविले होते. त्यावेळी १८५ अर्ज सादर झाले होते. यासाठी १ लाख ८० हजार रुपये विक्री किंमत निश्चित करण्यात आली होती. मात्र ठाणे महानगरपालिकेने भूखंडांची जागा विस्थापितांच्या घरांसाठी आरक्षित केली आणि कोकण मंडळाची योजना रखडली. मात्र पुढे स्विस चॅलेंज पद्धतीने या भूखंडांवर बहुमजली इमारत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. आता या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या इमारतीत एक हजाराहून अधिक घरे असून यापैकी १५६ घरे २००० सालातील १८५ पैकी १५६ अर्जदारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. उर्वरित २५ अर्जदार आता उच्च उत्पन्न गटात मोडत असल्याने त्यांना ही घरे देता येणार नसल्याचे कळविण्यात आले आहे. तर १५६ घरांसाठी कोकण मंडळाने ५१ लाख ते ५२ लाख रुपये अशी विक्री किंमत निश्चित केली आहे. मात्र ही किंमत १५६ अर्जदारांना अमान्य आहे. या किंमती भरमसाठ असून आम्हाला परवडणाऱ्या नाहीत. त्यामुळे किंमती कमी कराव्या, अशी मागणी अर्जदारांनी कोकण मंडळाकडे केली आहे. २५ वर्षांपासून म्हाडाने आम्हाला घरापासून वंचित ठेवले, घर मिळेल या आशेवर आम्ही म्हाडाच्या इतर सोडतीत अर्ज करू शकलो नाही, इतरत्र घर घेऊ शकलो नाही आणि आता २५ वर्षांनंतर ५१ लाख ते ५२ लाखांत घरे देत आहेत. हे अन्यायकारक आहे, असे अर्जदार हेमंत पांडे यांनी सांगितले. अनेक अर्जदार आता ६०, ७० वर्षांचे असून त्यांना या वयात ४५ लाख ते ५० लाखांचे कर्ज कोणती बँक देणार, त्यांनी काय करायचेस असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
चितळसरमधील घरे १५६ अर्जदारांना २०२१ मध्ये कोकण मंडळाने घराची किंमत ३१ लाख रुपये सांगितली होती. ही किंमत अर्जदारांनी मान्य केली होती. मात्र आता थेट ५१ लाख ते ५२ लाख रुपये किंमत करण्यात आल्याने अर्जदार नाराज आहेत. त्यामुळेच या अर्जदारांनी मंडळाकडे अद्याप समंतीपत्र सादर केलेले नाही. या पार्श्वभूमीवर लेखी संमतीपत्र सादर करण्यासाठी मंडळाने अर्जदारांना १० सप्टेंबरपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. या मुदतीत संमती पत्र सादर न केल्यास घराचा हक्क रद्द होण्याची शक्यता आहे. मंडळाच्या या भूमिकेवरही अर्जदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. घराची किंमत कमी करावी अशी मागणी म्हाडा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, असे असताना संमती पत्रासाठी अंतिम मुदत कशी दिली जाते, असा प्रश्नही पांडे यांनी उपस्थित केला आहे. घरांच्या किंमती कमी करणे शक्य नाही. याच किंमतीत घरे विकली जातील. ज्यांना या किंमती मान्य असतील त्यांनी संमतीपत्र सादर करावे, ही मुदत अंतिम असेल, त्यानंतर संमतीपत्र सादर न झालेल्या घरांचे काय करायचे याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल, अशी माहिती कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली. यावर अर्जदारांनी रस्त्यावर उतरण्यासह गरज पडल्यास न्यायालयात धाव घेण्याची तयारी दर्शविली आहे.