मुंबई – म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५ हजार २८५ घरांसह ७७ भूखंडांच्या सोडतीतील २० टक्के सर्वसमावेश योजनेतील अर्थात खासगी विकासकांच्या प्रकल्पातील घरांनाच अर्जदारांनी मोठी पसंती मिळाली आहे. २० टक्के योजनेतील ५६५ घरांसाठी एकूण प्राप्त अर्जांपैकी तब्बल ९२ टक्के अर्ज प्राप्त झाले आहेत.
सोडतीच्या अर्जविक्रीची मुदत नुकतीच संपुष्टात आली असून या मुदतीत १ लाख ८४ हजार ९९४ जणांनी अर्ज भरले आहेत. त्यापैकी १ लाख ५८ हजार ४२४ अर्जदारांनी अनामत रक्कमेसह अर्ज सादर केले आहेत. तर १ लाख ५८ हजार ४२४ अर्जांपैकी १ लाख ४६ हजार ४३२ अर्ज हे २० टक्क्यांतील ५६५ घरांसाठी आहेत. दुसरीकडे म्हाडा योजनेसह १५ टक्के एकात्मिक योजनेतील घरांसाठी आठ टक्केच अर्ज आल्याने म्हाडा योजनेतील घरांकडे अर्जदारांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे.
कोकण मंडळाकडून ५ हजार ३८५ घरांसह ७७ भूखंडाच्या सोडतीसाठी १४ जुलैपासून नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीस सुरुवात केली होती. मात्र या सोडतीला म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्याने कोकण मंडळाने नोंदणी अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेस दोनदा मुदतवाढ दिली.त्यामुळे सोडतीच्या निकालीची तारीखही दोनदा पुढे गेली आहे. दुसऱया मुदतवाढीनुसार अखेर आता नोंदणी आणि अर्जविक्रीची मुदत नुकतीच संपली आहे. या मुदतीत कोकण मंडळाच्या सोडतीसाठी १ लाख ८४ हजार ९९४ जणांनी अर्ज भरले आहेत. त्यातील १ लाख ५८ हजार ४२४ अर्जदारांनी अनामत रक्कमेसह अर्ज दाखल केले आहेत.
आरटीजीएस-एनईएफटीद्वारे अनामत रक्कम भरून अर्ज सादर करण्याची मुदत सोमवारी रात्री उशीरा संपणार आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळी या सोडतीसाठी नेमके किती अर्ज दाखल झाले हे स्पष्ट होईल. दरम्यान आतापर्यंत अनामत रक्कमेसह १ लाख ५८ हजार ४२४ अर्ज आतापर्यंत दाखल झाले आहेत. सोमवारी रात्री उशिरापर्यंत अर्जदारांना अनामत रक्कम अदा करून अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर प्राप्त अर्जांची छाननी करून ७ आॅक्टोबरला सायंकाळी ६ वाजता पात्र अर्जांची अंतिम यादी कोकण मंडळाकडून प्रसिद्ध केली जाईल. त्यावेळी ५ हजार २८५ घरांसह ७७ भूखंडासाठी किती अर्जदार स्पर्धेत असतील हे स्पष्ट होईल.
खासगी विकासकांची घरेच हवीत
अनामत रक्कम अदा करत अर्ज दाखल करण्यासाठी काही तास शिल्लक असताना सोमवारी सकाळी ९ वाजेपर्यंत दाखल झालेल्या अर्जांच्या संख्येनुसार अर्जदारांनी खासगी विकासकांच्या घरांना प्रचंड प्रतिसाद दिल्याचे स्पष्ट झाले आहे. प्राप्त १ लाख ५८ हजार ४२४ अर्जांपैकी ९२ टक्के अर्थात १ लाख ४६ हजार ४३२ अर्ज २० टक्के योजनेतील ५६५ घरांसाठी आले आहेत. त्यामुळे सोडतीतील या घरांसाठी अर्जदारांमध्ये चुरस असेल. मात्र त्याचवेळी १५ टक्के एकात्मिक योजनेसह म्हाडा योजनेतील घरांना अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे.
१५ टक्के योजनेतील ३००२ घरांसाठी अनामत रक्कमेसह ४९८५ अर्ज, म्हाडा योजनेतील १६७७ घरांसाठी ६३४६ अर्ज आणि इतर योजनेतील ४१ घरासाठी १७०४ अर्ज आले आहेत. तसेच ७७ भूखंडासाठी ६२३ अर्ज आले आहेत. प्राप्त अर्जांच्या आठ टक्के अर्ज २० टक्के योजनेतील घरे वगळता इतर घरांसाठी आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा म्हाडाच्या योजनेसह इतर योजनेतील घरांना प्रतिसाद मिळत नसल्याचे अधोरेखित झाले आहे.