लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या १४ ऑगस्टच्या सोडतीतील १२०० अयशस्वी अर्जदार अद्यापही अनामत रकमेच्या परताव्याच्या प्रतीक्षेत आहेत. खाते क्रमांक चुकीचा नोंदविल्यामुळे वा इतर कारणांमुळे या अर्जदारांना अनामत रकमेचा परतावा मिळालेला नाही. मात्र शक्य तितक्या लवकर ही रक्कम परत करण्याचा मंडळाचा मानस आहे.
आणखी वाचा-वेध माऊंट मेरी जत्रेचे, दुकानांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू
मुंबई मंडळाच्या ४०८२ घरांसाठी एक लाख २२ हजार अर्जदारांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले होते. यातील एक लाख २० हजार १४४ अर्जदार सोडतीसाठी पात्र ठरले होते. तर यातील केवळ ४०८२ जण विजेते ठरले आहेत. त्यामुळे एक लाख १७ हून अधिक जणांना अनामत रकमेचा परतावा करण्याची जबाबदारी मंडळावर होती. त्यानुसार १७ ऑगस्टपासून या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून आतापर्यंत एक लाख १६ हजारांहून अधिक अर्जदारांना अनामत रक्कम परत करण्यात आल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तर आता केवळ १२०० अर्जदारांना रक्कम परत करणे बाकी आहे. यापैकी बहुसंख्य अर्जदारांनी बँक खाते क्रमांक आणि खात्याबाबतची माहिती चुकवली आहे. त्यामुळे त्यांना अनामत रक्कम परत करता आली नसल्याचेही त्यांनी सांगितले. सोडतीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या बँकेकडून आता या १२०० जणांना अनामत रक्कम परत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या १५ दिवसांत हा परतावा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.