मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने चेंबूरमधील टिळकनगर येथे नवीन १४४ घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. १९ मजली इमारतीत ही घरे असणार असून या इमारतीचे भूमिपूजन गुरुवारी होणार आहे. या इमारतीत अल्प गटासाठी ७४, तर मध्यम गटासाठी ७० घरे असणार आहे. भूमिपूजनानंतर घरांच्या बांधकामाला सुरुवात करून अडीच ते तीन वर्षांत घरांचे बांधकाम पूर्ण करण्याचे मुंबई मंडळाचे नियोजन आहे. त्यामुळे म्हाडाच्या माध्यमातून चेंबूरमध्ये हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी इच्छुकांना येत्या काळात उपलब्ध होणार आहे.
टिळक नगर येथे मुंबई मंडळाचा ११४७.९० चौरस मीटरचा एक मोकळा भूखंड आहे. दोन वर्षांपूर्वी मंडळाने म्हाडाने या भूखंडांवर परवडणाऱ्या घरांची योजना राबविण्यासाठी टर्न कि पद्धतीने हाल्को इन्फ्राप्रोजेक्टस या कंपनीला कंत्राट दिले होते. मुंबई मंडळाने पुढील कार्यवाही करून आता या भूखंडावरील घरांच्या कामाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी या प्रकल्पाचे भूमिपूजन म्हाडा प्राधिकरणाचे मुख्य अभियंता-२ महेश जेसवानी, उपमुख्य अभियंता (पूर्व), मुंबई मंडळ, अनिल अंकलगी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या प्रस्तावानुसार १९ मजली इमारतींमध्ये अल्प गटासाठी ४४.६० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या ७४, तर मध्यम गटासाठी ५९.६० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या ७० घरांचा समावेश असणार आहे. या इमारतीत ५ दुकानांचाही समावेश असणार आहे. तर १६५ चौरस फुटांचे सोसायटी कार्यालय, ६७० चौरस फुटांची व्यायामशाळा, सौर ऊर्जा, उद्यान आदी सुविधांचाही या प्रकल्पात समावेश असणार आहे. तर या इमारतीत वाहनतळाचीही सुविधा असणार असून येथे ३८ वाहने उभी करता येणार आहेत.
टिळकनगरमधील १४४ घरांच्या कामाला आता सुरुवात होणार आहे. कामाला सुरुवात झाल्यापासून अडीच ते तीन वर्षाच्या कालावधीत ही घरे पूर्ण होण्याची शक्यता आहे. या घरांसाठी २०२६ मध्ये सोडत काढली जाण्याची शक्यता आहे. चालू बांधकाम प्रकल्पातील घरांसाठी सोडत काढण्याचे धोरण म्हाडा प्राधिकरणाने स्वीकारले आहे. त्यामुळे या घरांसाठी आधीच सोडत काढून सोडतीनंतरची प्रक्रिया पूर्ण करून घेण्यात येणार असून घरांचे काम पूर्ण झाल्यानंतर निवासी दाखला मिळवून घरांचा ताबा देण्याचे म्हाडा प्राधिकरणाचे नियोजन आहे.