मुंबई : मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) ग्रोथ हब प्रकल्पाअंतर्गत म्हाडाने एमएमआरमध्ये वृद्धाश्रम आणि नोकरदार महिलांसाठी वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार म्हाडाच्या कोकण मंडळाच्या माध्यमातून ठाण्यातील माजीवाडा येथे सात मजली वृद्धाश्रम आणि सात मजली नोकरदार महिलांसाठी वसतिगृह बांधण्याची तयारी सुरू केली होती. मात्र आता हे दोन्ही प्रकल्प अडचणीत आले आहेत. कोकण मंडळाने वसतिगृह आणि वृद्धाश्रम बांधण्यासाठी निश्चित केलेली जागा ठाण्याच्या समूह पुनर्विकास प्रकल्पात गेली आहे. त्यामुळे आता येथे वृद्धाश्रम आणि वसतिगृह बांधणे शक्य होणार नाही.
दरम्यान, वृद्धाश्रम आणि वसतिगृहाची जागा समूह पुनर्विकासाच्या आराखड्यातून वगळावी, अशी मागणी कोकण मंडळाने ठाणे महानगर पालिकेला केली आहे. ही मागणी मान्य झाली नाही तर कोकण मंडळाला दुसरी जागा शोधावी लागणार असून त्यासाठी वेळ लागल्यास प्रकल्पास विलंब होणार आहे.
राज्याच्या गृहनिर्माण धोरणात ज्येष्ठ नागरिक,महिला, विद्यार्थी यांच्याही निवाऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. तर दुसरीकडे ग्रोथ हबच्या अनुषंगाने भविष्यात शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने एमएमआरमध्ये येणाऱ्या महिला, विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड वाढणार आहे. ही बाब लक्षात घेऊन ग्रोथ हब प्रकल्पात नोकरदार महिला आणि विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्यासह ज्येष्ठांसाठी वृद्धाश्रम बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई आणि ठाण्यात पहिल्या टप्प्यात वृद्धाश्रम आणि महिला वसतिगृह बांधण्याची कार्यवाही सुरू आहे.
कोकण मंडळाने माजीवाडा येथील विवेकानंद नगर अभिन्यासातील अंदाजे १३०० चौ. मीटर जागेवर वृद्धाश्रम, तर १५०० चौ.मीटर जागेवर महिला वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही इमारती सात मजली असून यात आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविल्या जाणार आहेत. वृद्धाश्रमासाठी ११ कोटी रुपये आणि वसतिगृहासाठी ११ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी निविदा प्रक्रियाही राबविण्यात आली असून शक्य तितक्या लवकरच या दोन्ही इमारतींच्या बांधकामाला सुरुवात करण्याचे कोकण मंडळाचे नियोजन होते. मात्र आता या प्रकल्पाला ठाणे महानगर पालिकेकडून मान्यता मिळत नसल्याचे तो अडकला आहे. ज्या जागेवर या दोन्ही इमारती बांधण्यात येणार आहेत ती जागा समूह पुनर्विकास प्रकल्पात गेली आहे. त्यामुळे आता कोकण मंडळाची अडचण वाढली आहे.
वृद्धाश्रम आणि वसतिगृहाची जागा समूह पुनर्विकासातून वगळावी, अशी मागणी कोकण मंडळाने पालिकेकडे केली असून यासाठी पाठपुरावा सुरू आहे. यास कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दुजोरा दिला आहे. ही मागणी मान्य झाली नाही तर या दोन्ही प्रकल्पासाठी दुसरी जागा शोधावी लागणार असल्याची माहिती कोकण मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.