‘प्रथम प्राधान्य तत्वावर घरांची विक्री’
मुंबई :MHADA’s Diwali Special Sale म्हाडाचे मुंबई मंडळ दिवाळीत पाच हजार घरांच्या सोडतीसाठी जाहिरात काढणार होती. मात्र पुरेशी घरे नसल्याने ही सोडत लांबणीवर पडली. असे असले तरी दिवाळीत म्हाडाचे घर खरेदी करण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. मुंबई मंडळ दिवाळीत प्रथम ‘येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्वावर घरांच्या विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध करणार आहे. मंडळाने यासाठी तयारी सुरू केली आहे. ताडदेवमधील उच्च उत्पन्न गटातील सात कोटी रुपयांच्या घरासह तुंगा पवई आणि अन्य ठिकणच्या विक्रीवाचून रिक्त असलेल्या घरांचा यात समावेश करण्यात येणार आहे. या घरांची संख्या २०० च्या आसपास असण्याची शक्यता आहे.
सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करण्यासाठी म्हाडाच्या विभागीय मंडळाकडून सोडत काढण्यात येते. मात्र मागील काही वर्षांपासून कोकण मंडळ, पुणे मंडळ आणि इतर मंडळांतील घरांना विविध कारणांने प्रतिसाद मिळत नसून घरे विक्रीवाचून धूळ खात पडून आहेत. दरम्यान दोन वा त्यापेक्षा अधिक वेळा सोडत काढूनही घरे विकली जात नसल्यास या घरांचे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्वावर वितरण करण्याची तरतूद म्हाडाच्या धोरणात आहे. त्यामुळे आता म्हाडा रिक्त घरांची विक्री ‘प्रथम प्राधान्य’ तत्वाने करण्यावर भर देत आहे. त्यानुसार कोकण आणि पुणे मंडळातील हजारो घरांची या तरतुदीनुसार विक्री सुरू आहे.
आता मुंबई मंडळातील रिक्त, विकली जात नसलेल्या घरांचे वितरण ‘प्रथम प्राधान्य’ तत्वाने करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती म्हाडा प्राधिकरणातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली. महत्त्वाचे म्हणजे दिवाळीत या घरांच्या वितरणासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
म्हाडा प्राधिकरणाच्या आदेशानुसार मुंबई मंडळातील पणन विभागाने आता दोन वा त्यापेक्षा अधिक वेळा सोडत काढूनही विकल्या जात नसलेल्या घरांची शोधाशोध सुरू केली आहे. अशा घरांची माहिती संकलित करून शक्य तितक्या लवकर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ‘प्रथम प्राधान्य’ तत्वानुसार जो कोणी आधी येईल आणि अर्ज करेल अशा पात्र अर्जदाराला घर वितरीत करण्यात येते. त्यामुळे मुंबईकरांना दिवाळीत मुंबईत घर घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
२०२३ च्या मुंबई मंडळाच्या सोडतीत ताडदेव येथील क्रिसेंट टाॅवरमधील साडेसात कोटींच्या सात घरांचा समावेश होता. उच्च उत्पन्न गटातील या घरांना शून्य प्रतिसाद मिळाल्याने सातही घरे पडून आहेत. या घरांच्या किंमती कमी करून त्या सात कोटी करण्यात आल्यानंतरही घरांना प्रतिसाद मिळाला नाही. पवई, तुंगामधील काही घरांची विक्री झालेली नाही. ताडदेव, पवईसह अन्य २०० च्या आसपासच्या घरांची ‘प्रथम प्राधान्य’ तत्वावर विक्री करण्यासाठी दिवाळीत जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
अनेक वर्षानंतर मुंबईत ‘प्रथम प्राधान्य’ तत्वावर घरांची विक्री
कोकण मंडळ, पुणे मंडळ वा इतर मंडळातील घरांची सातत्याने ‘प्रथम प्राधान्य’ तत्वावर विक्री होते. पण मागील १९ वर्षांत मुंबई मंडळातील घरांची विक्री ‘प्रथम प्राधान्य’ तत्वावर झालेली नाही. मुंबईतील घरांची २००६ पूर्वी ‘प्रथम प्राधान्य’ तत्वावर विक्री करण्यात आली होती. त्यानंतर २००७ पासून काढण्यात आलेल्या मुंबई मंडळाच्या घरांना प्रचंड प्रतिसाद मिळत आला आहे. काही हजार घरांसाठी लाखोने अर्ज येतात. आजही मुंबई मंडळाच्या घरांना चांगला प्रतिसाद मिळतो. मात्र उच्च आणि मध्यम गटातील घरे महाग असल्याने काही घरे विक्रीविना राहात आहेत. त्यामुळे तब्बल १९ वर्षांनंतर मुंबई मंडळातील घरांची ‘प्रथम प्राधान्य’ तत्वावर विक्री होणार आहे.