‘म्हाडा’ने मुंबईतील १२४४ घरांसाठी काढलेल्या सोडतीसाठी अर्ज करण्याची मुदत बुधवारी संपली. अर्जाची मुदत संपत असताना एकूण ८८,९२१ ऑनलाइन अर्ज दाखल झाले. पण अनामत रकमेसह दाखल झालेल्या अर्जाची संख्या ७०,४२६ असून त्यात थोडीफार वाढ होऊन हे अर्जदार सोडतीसाठी पात्र ठरतील. त्यामुळे १२४४ घरांसाठी सुमारे ७१ हजार अर्जदार असे चित्र यंदा समोर आले आहे. लाखाचा टप्पा यावेळी हुकला आहे.
‘म्हाडा’च्या घरांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी २१ मे रोजी संपली. बुधवारी अर्ज अनामत रकमेसह अॅक्सिस बँकेत भरण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी बँकेत ७८१५ अर्ज जमा झाले. सर्व ठिकाणाहून अंतिम आकडेवारी आल्यानंतर अनामत रकमेसह जमा झालेल्या अर्जाची अंतिम संख्या स्पष्ट होईल. ‘म्हाडा’ने यंदा १२५९ घरांसाठी जाहिरात काढली. त्यात बांधून तयार असलेल्या २५१ घरांचा समावेश आहे. ५७ घरांचे बांधकाम झाले असून भोगवटा प्रमाणपत्र मिळणे बाकी आहे. तर बांधकाम सुरू असलेल्या ९५१ घरांचा समावेश होता. पण आता जाहिरातीनंतर पुन्हा एकदा सोडतीमधील घरांच्या संख्येत बदल झाला आहे. बांधकाम सुरू असलेल्या घरांच्या संख्येत १५ घरांची कपात झाली असून आता ती संख्या ९३६ वर आली आहे. त्यामुळे यंदाची सोडत १२४४ घरांची असणार आहे.
बँकेकडून जमा झालेल्या साऱ्या अर्जाची माहिती २४ मे रोजी ‘म्हाडा’कडे येईल. अर्जाची छाननी करून सोडतीसाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांची यादी २६ मे रोजी ‘म्हाडा’च्या संकेतस्थळावर जाहीर होईल. याबाबतची सूचना ‘एसएमएस’द्वारे अर्जदारांना देण्यात येईल. आपल्या नाव वा इतर तपशीलात काही दुरुस्ती असेल वा यादीत नाव नसेल तर अर्जदारांनी २८ मे पर्यंत ‘म्हाडा’शी संपर्क साधावा. त्यानंतर २८ मे रोजी अंतिम यादी जाहीर होईल. ३१ मे रोजी सोडत निघेल.
संग्रहित लेख, दिनांक 23rd May 2013 रोजी प्रकाशित
म्हाडा लॉटरीत अर्जदारांचा ‘लाखा’चा टप्पा नाहीच!
‘म्हाडा’ने मुंबईतील १२४४ घरांसाठी काढलेल्या सोडतीसाठी अर्ज करण्याची मुदत बुधवारी संपली. अर्जाची मुदत संपत असताना एकूण ८८,९२१ ऑनलाइन अर्ज दाखल झाले. पण अनामत रकमेसह दाखल झालेल्या अर्जाची संख्या ७०,४२६ असून त्यात थोडीफार वाढ होऊन हे अर्जदार सोडतीसाठी पात्र ठरतील. त्यामुळे १२४४ घरांसाठी सुमारे ७१ हजार अर्जदार असे चित्र यंदा समोर आले आहे.
First published on: 23-05-2013 at 04:08 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mhada received 70426 application for 1244 flat