मुंबई : मुंबई मंडळाने मुंबईतील विविध ठिकाणच्या १४९ भाड्याच्या दुकानांच्या ई लिलावाचा निकाल शुक्रवारी जाहीर केला. या निकालानुसार १४९ दुकानांपैकी केवळ ७० दुकानांचा ई लिलाव पूर्ण झाला असून उर्वरित एकूण ७७ दुकानांसाठी एकही अर्ज आला नव्हता. यावरून मुंबईकरांनी म्हाडाच्या दुकानांकडे पाठ फिरवल्याचे स्पष्ट होत आहे.

म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पात रहिवाशांच्या सुविधेसाठी काही दुकाने बांधण्यात येतात. या दुकानांची विक्री ई लिलाव पद्धतीने केली जाते. त्यानुसार मुंबईतील विविध ठिकाणच्या १४९ दुकानांसाठी १२ ऑगस्टपासून नोंदणी अर्जविक्री आणि अर्जस्वीकृती प्रक्रिया सुरू होती. ही प्रक्रिया पूर्ण करून मुंबई मंडळाने शुक्रवारी दुकानांच्या लिलावाचा निकाल जाहीर केला.

१४९ दुकानांसाठी मंडळाकडे केवळ ४५४ अर्ज अनामत रकमेसह दाखल झाले होते. तर हे ४५४ अर्ज १४९ पैकी केवळ ७२ दुकानांसाठी आले होते. ७७ दुकानांसाठी एकही अर्ज आला नव्हता. तर शुक्रवारी ई लिलावाच्या निकालाच्या वेळी केवळ ७० दुकाने विकली गेल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

मागच्या वर्षी १७३ पैकी १२४ दुकाने विक्रीवाचून रिक्त राहिली होती. तर आता यावेळी १४९ पैकी ७९ दुकाने रिक्त राहिली आहेत. या रिक्त दुकानांचा पुन्हा ई लिलाव केला जाईल. मात्र म्हाडाच्या दुकानांना ग्राहक मिळत नसल्याने ही बाब गंभीर मानली जात आहे. दुकानांच्या किमती अधिक असल्याने दुकाने विकली जात नसल्याची चर्चा आहे.