मुंबई : कलिना, सांताक्रूझ येथील मौजे कोलेकल्याण येथील म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ८००० चौरस मीटर जागेवर लवकरच टेनिस कोर्ट आणि त्यासाठी आवश्यक सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. मुंबई मंडळ आणि महाटेनिस फाऊंडेशनच्या संयुक्त भागिदारीने येथे टेनिस खेळासाठीच्या सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. तर विकसित टेनिस कोर्ट, इतर सुविधांचे व्यवस्थापन, देखभालीची जबाबदारी ३० वर्षांसाठी महाटेनिस फाऊंडेशनकडे सोपविण्यात येणार आहे. यासंबंधीच्या प्रस्तावास नुकत्याच झालेल्या म्हाडा प्राधिकरणाच्या ३०१ व्या बैठकीत मान्यता देण्यात आली. आता लवकरच कोलेकल्याण येथे टेनिस खेळाडूंसाठी सरावाची चांगली सोय उपलब्ध होणार आहे.
कोलेकल्याण येथे मुंबई मंडळाचा गृहप्रकल्प आहे. येथे मुंबई मंडळाच्या मालकीची जागा आहे. महाटेनिस फाउंडेशनने काही महिन्यांपूर्वी येथील दोन एकर जागा टेनिसच्या पायाभूत सुविधांसाठी देण्याची मागणी एका पत्राद्वारे केली होती. टेनिस खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने ही मागणी करण्यात आली होती. त्यानुसार कोलेकल्याण येथील ८००० चौरस मीटर जागेवर संयुक्त भागिदारी तत्त्वावर टेनिस कोर्ट आणि या खेळाच्या अनुषंगाने इतर सुविधा निर्माण करण्याचा प्रस्ताव ३०१ व्या म्हाडा प्राधिकरण बैठकीत ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
आता कोलेकल्याण येथील म्हाडाच्या जागेवर लवकरच टेनिससाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. प्रस्तावानुसार जागेची संपूर्ण मालकी म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे असणार आहे. तर टेनिस कोर्ट आणि इतर सुविधांचे व्यवस्थापन, देखभालीची जबाबदारी महाटेनिस फाउंडेशनवर असणार आहे.
सुमारे ८००० चौरस मीटर जागेवर टेनिससाठी सुविधा विकसित करण्यासाठी म्हाडाकडून १० कोटी रुपये भागभांडवल उपलब्ध करण्यात येणार आहे. तर महाटेनिस फाऊंडेशन ५ कोटी रुपये निधी देणार आहे. यासाठी म्हाडा आणि महाटेनिस फाऊंडेशन यांच्यात करार करण्यात येणार असून अनेक अटी-शर्ती यात समाविष्ट असणार आहेत.
महत्त्वाचे म्हणजे येथे म्हाडा कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी २० जागा राखीव असणार असून येथे त्यांना निःशुल्क टेनिस प्रशिक्षण दिले जाणार आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्याने आता लवकरच सामंजस्य करार करून, मुंबई मंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊन टेनिस कोर्ट, तसेच इतर सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.