निशांत सरवणकर

घर घोटाळ्यात सहमुख्य अधिकाऱ्याचा सहभाग आढळून आल्यामुळे सावधगिरी म्हणून म्हाडाच्या इमारत व दुरुस्ती पुनर्रचना मंडळाने बृहद्सूची (मास्टर लिस्ट) कोरी करण्याचे ठरविले आहे.

इमारत धोकादायक घोषित झाल्यास वा कोसळल्यास किंवा इमारत आहे त्याच जागी बांधण्याइतपत भूखंड नसल्यास अशा रहिवाशांची पर्यायी व्यवस्था संक्रमण शिबिरात केली जाते. संक्रमण शिबिरातील या रहिवाशांची बृहद्सूची तयार केली जाते. विकास नियंत्रण नियमावली ३३ (७) नुसार विकासकाने पुनर्विकसित केलेल्या किंवा दुरुस्ती मंडळाने बांधलेल्या पुनर्रचित इमारतीत अतिरिक्त सदनिका उपलब्ध झाल्यास त्या बृहद्सूचीनुसार वितरित करण्यात येतात. म्हाडा अधिकारी व दलाल यांचा या वितरणावर पगडा असतो. दलालांमार्फत आल्यावरच अशी घरे वितरित केली जातात.

सहमुख्य अधिकारी अविनाश गोटे यांनी अशीच पाच प्रकरणे अनधिकृतपणे यादीत समाविष्ट केली. ते सिद्ध झाल्याने घर घोटाळा उघड झाला.

गेले दोन-तीन वर्षे म्हाडातच ठाण मांडून बसलेल्या गोटे यांनी अशा किती प्रकरणांचा घोटाळा केला हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. या पार्श्वभूमीवर म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर आणि मुख्य अधिकारी सतीश लोखंडे यांनी या संपूर्ण प्रकरणात पारदर्शकता आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अर्ज मागवून संपूर्ण बृहद्सूची संकेतस्थळावर टाकली. आता घर घोटाळ्यानंतर ही यादी वृत्तपत्रातून प्रकाशित करण्यात आली आहे. या यादीबाबत आक्षेप असल्यास ते नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

झाले काय?

बृहद्सूचीमधील ९५ रहिवाशांना घरे देण्याचे निश्चित झाल्यानंतर अधिकृत यादी प्रसिद्ध होण्याआधीच १६ देकारपत्रे तयार होती. एक वादग्रस्त महिला मिळकत व्यवस्थापक तसेच लिपिकांच्या सहीनिशी ही देकारपत्रे देऊन काहींना ताबापत्रेही देण्यात आली होती. दलालांमुळेच इतकी कार्यक्षमता या म्हाडा अधिकाऱ्यांनी दाखविली होती, असेही आता स्पष्ट होत आहे. त्यामुळे दुरुस्ती मंडळाच्या या विभागाची संपूर्णपणे फेररचना करण्यात येणार आहे. याशिवाय गोटे यांचा कार्यभार उपमुख्य अभियंता एस. जी. अंकलगी यांना देण्यात आला आहे. त्यांनी आता या विभागात अभियंत्यांची नियुक्ती करण्याचे ठरविले आहे. असे झाल्यास घर घोटाळ्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

संक्रमण शिबिरात खितपत पडलेल्या बृहद्सूचीमधील प्रत्येक पात्र रहिवाशाला हक्काचे घर मिळावे, या दिशेने म्हाडा प्रयत्नशील आहे.

– मिलिंद म्हैसकर, उपाध्यक्ष, म्हाडा