मुंबई : सध्या देशभरात मत चोरीच्या आरोपांवरून राळ उडालेली असतानाच दक्षिण मुंबईतील पदपथावर कुटुंबासह वास्तव्यास असलेल्या परप्रांतीयांनी लगतच्याच गृहनिर्माण सोसायटीच्या पत्त्याचा वापर करून बनावट कागदपत्रांच्या आधारे मतदार ओळखपत्र मिळविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे पॅन कार्ड, आधार कार्ड, वीज जोडणी, स्वयंपाकाचा गॅस, महापालिकेचे गुमास्त अनुज्ञापत्र हे देस्ताऐवजदेखील त्यांनी प्राप्त केले.
यासंदर्भात संबंधित यंत्रणांकडे तक्रार करण्यात आली, मात्र मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक पोलीस ठाण्याव्यतिरिक्त अन्य यंत्रणांनी मात्र या प्रकरणात कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही, असा आरोप गृहनिर्माण सोसायटीतील रहिवासी आणि हे प्रकरण उघडकीस आणणाऱ्या ‘आम्ही गिरगावकर’ संघटनेने केला आहे.
दक्षिण मुंबईतील काळबादेवी परिसरात मोक्याच्या ठिकाणी असलेल्या पोपटवाडीतील पदपथावर मोठ्या संख्येने परप्रांतीय आहेत. पोपटवाडीतील गोल्ड मोहर हाऊसिंग सोसायटी आणि आसपासच्या इमारतींच्या पत्त्याचा वापर करून या परप्रांतीयांनी संबंधित यंत्रणांकडून आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र तयार केल्याचे सोसायटी सदस्यांच्या निदर्शनास आले आहे. यासाठी सोसायटीचे बनावट देखभाल देयक (मेन्टेनन्स बिल) तयार करण्यात आल्याची माहिती रहिवाशांनी संबंधित यंत्रणांकडून माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत केलेल्या अर्जाच्या उत्तरातून उघड झाली.
‘आम्ही गिरगावकर’ संघटनेचे गौरव सागवेकर, अभय कठाळे, शिल्पा नायक, कुणाल लिमजे, आदित्य परब आदींनी विविध यंत्रणांमध्ये खेटे घालून यासंदर्भातील कागदपत्र मिळवून हे प्रकरण उघडकीस आणले आहे. यासंदर्भात एल. टी. मार्ग पोलीस ठाणे, मुंबई महानगरपालिकेचे सी विभाग कार्यालय, जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालय (मुंबई शहर), मतदार नोंदणी अधिकारी (१८७ – कुलाबा विधानसभा मतदारसंघ), मतदार नोंदणी अधिकारी (१८७ – कुलाबा विधानसभा मतदारसंघ) आदी यंत्रणांकडे तक्रार करण्यात आली.
मुंबई महानगरपालिका आणि एल. टी. पोलीस ठाण्याने या परप्रांतीयांवर अस्वच्छता आणि झोपडी बांधण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वेळोवेळी कारवाईही केली. परंतु अन्य यंत्रणा मात्र या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्यास तयार नाहीत, असा आरोप गोल्ड मोहर हाऊसिंग सोसायटीतील रहिवासी अभय कठाळे यांनी केला आहे. कागदपत्रांची योग्य पडताळणी न करताच दस्ताऐवज परप्रांतीयांना देणाऱ्या संबंधित यंत्रणांमधील कर्मचाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी ‘आम्ही गिरगावकर’चे गौरव सागवेकर यांनी केली आहे.
मतदार यादीत नावे काही परप्रांतीयांची नावे २००९ ते २०२३ या कालावधीत कुलाबा विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत समाविष्ट करण्यात आल्याची कबुली मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी (१८७ – कुलाबा विधानसभा मतदारसंघ) स्थानिक पोलीस ठाण्याला पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. याप्रकरणी चौकशी करण्याची सूचना या पत्रात करण्यात आली आहे. परंतु पुढे काहीच झालेले नाही.