मुंबई : गोवंडी येथील बैंगनवाडी परिसरातील एका दुग्धालयातील दुधात भेसळ झाल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत. दुधाचे नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे आता अन्य दुग्धालयांमधील दुधाविषयी नागरिकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. तसेच, गोवंडीतील अन्य दुग्धालयांमधील दुधाची चाचणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे.

दुधाची मात्रा वाढवण्यासाठी, तसेच दूध अधिक काळ टिकावे यासाठी दुग्धालय चालक दुधात भेसळ करीत असल्याचा संशय आहे. काही दिवसांपूर्वी गोवंडीतील विनायक डेअरीतून एका रहिवाशाने दूध विकत आणले होते. दूध गरम केल्यांनतर त्यात चिंच टाकली. मात्र, दुधात काहीही फरक पडला नाही. त्यांनतर दुधात लिंबाचा रस मिसळण्यात आला. जवळपास चार तास प्रतीक्षा केल्यानंतरही दूध फाटले नाही. त्यामुळे दुधात सिंथेटिक, रासायनिक पदार्थांचा वापर करण्यात आल्याचा संशय बळावला. रविवारी रात्री संबंधित डेअरीसमोर रहिवाशांनी मोठी गर्दी केली होती. त्यांनतर, शिवाजी नगर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दूध असलेले वाहन सील केले आणि दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठवले. तसेच, दूध तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोवंडीतील अन्य दुग्धालयांमध्येही भेसळयुक्त दुधाची विक्री होत असल्याचा संशय आहे. या दुग्धालयात कोणाकडून दुधाचा पुरवठा केला जातो याचा शोध घ्यावा आणि त्याच्याविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते फैयाज शेख यांनी केली आहे.