मुंबई : षटकोनी आकाराचे आणि खाली झिरमिळ्या असलेल्या कागदी आकाश कंदील ही खरेतर मराठी दिवाळीची ओळख. बाजारात हे आकाश कंदील मिळत असले तरी छोट्या आकाराचे आकाश कंदील उपलब्ध नाहीत. गिरगावातील शशिकांत वेस्वीकर (७०) आजोबा मात्र अतिशय नाजूक असे तब्बल तीन चार इंचाचे छोटे आकाश कंदील बनवतात.
आपली सोनारकामाची उपकरणे वापरून आकाश कंदिलाची अगदी हुबेहूब प्रतिकृती असलेले कंदील ते बनवतात. त्यांच्या या मिनिएचर आकाश कंदिलांना कलाप्रेमींनी भरभरून दाद दिली आहे.
गिरगावच्या मुगभाटात राहणारे शशिकांत वेस्वीकर यांनी छोटे आकाश कंदील बनवण्याची कला जोपासली आहे. एकेकाळी सोनारकाम करणारे वेस्वीकर आता वयोमानानुसार सोनारकाम फारसे करत नाहीत. पण आपली सोनारकामाची उपकरणे, सोनारकामाचे टेबल वापरून बारीक कलाकुसर असलेले छोटेसे आकाश कंदील बनवतात. त्यांची मुलगी साजिरी हिने सांगितले की, सुरुवातीला केवळ मुलांना, त्यांच्या मित्र-मैत्रीणींना देण्यासाठी लहान कंदील, पतंग ते बनवत होते.
पण हे कंदील ओळखीतील लोकांना इतके आवडत की ते कंदील बनवून मागत. त्यामुळे मग आम्ही त्यांना विचारले की तुम्ही जास्त कंदील बनवू शकता का ? तर त्यांनाही हुरुप आला आणि त्यांनी एका वर्षी पन्नास आकाश कंदील बनवले, मग दीडशे, दोनशे असे करत यंदा त्यांनी साडेपाचशे मिनी आकाश कंदील बनवले होते. हे सगळे कंदील यंदा विकले गेले असून घरच्यासाठी एकही कंदील उरला नाही. त्यामुळे पुढच्या वर्षी जास्त कंदील बनवायचे म्हणून ते आतापासूनच कामाला लागल्याचे साजिरी यांनी सांगितले.
एका कंदिलाला पाच दिवस
छोटे आकाश कंदील दिसायला छान असतात, पण एक कंदील बनवायला किमान पाच दिवस लागतात. त्याकरीता ते अगरबत्तीच्या काड्यांचा वापर करतात. अगरबत्तीच्या काड्या पाण्यात एक दिवस बूडवून, मग त्या तासून त्याचे छोटे छोटे चोकोन तयार करायचे, ते जोडून त्याचा षटकोनी सांगाडा तयार करायचा, मग त्यावर गम लावायचा, गम सुकायच्या आत पांढरा कागद लावायचा, वरून रंगीबेरंगी कागद चिकटवायचे, रंगीबेरंगी कागद बारीक कापून ते दुमडून त्याच्या करंज्या बनवायच्या, झिरमिळ्या बनवायच्या आणि त्या चिमट्यासारख्या सवाणा नावाच्या उपकरणाने उचलून कंदिलावर चिकटवायच्या.
तर सोन्याची चेन बनवण्यासाठी वापरले जाणारे गाभा हे उपकरण वापरून ते करंजी, फुले बनवतात. हे सगळे बारिक बारिक कलाकुसरीचे काम वेस्वीकर आनंदाने करतात. गिरगावातील छोट्याशा घरात सोनारकामाच्या टेबलावर त्यांचा हा कंदिलाचा छंद ते जोपासतात. त्यात त्यांची पत्नीही त्यांना मदत करते. वेस्वीकर यांच्या दोन्ही डोळ्यांवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया झाली असल्या तरी या हा नाजूक कलाकुसरीचा छंद त्यांनी जोपासला आहे.
त्यांच्या या कलेला ओळखीचे लोक दाद देतात. शेजारीपाजारी नातेवाईक सुद्धा अगरबत्तीच्या काड्या आणून देतात. यंदा वेसवीकर यांनी गिरगावातील एका प्रदर्शनात हे कंदिल विक्रीसाठी ठेवले होते. चारशे रुपये किंमत असतानाही कलाप्रेमी मंडळींनी अजिबात घासाघीस न करता हे कंदील विकत घेतले. अजूनही या कंदिलांना मागणी येत असते, असेही साजिरी यांनी सांगीतले.