मुंबई : मुंबई शहरातील पालकांचा कल इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढत आहे. त्यामुळे मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. पटसंख्या शून्यावर आल्यामुळे गत सहा वर्षांत ३९ मराठी शाळा बंद झाल्या आहेत. त्यात दक्षिण मुंबईतील १५ शाळांचा समावेश आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी एका प्रश्नाला लिखित उत्तराच्या माध्यमातून दिली.
सुनिल शिंदे यांनी या बाबतचा प्रश्न विधान परिषदेत उपस्थित केला होता. मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी २०१३-१४ पासून सेमी इंग्रजीचे वर्ग करण्यास परवानगी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना पोषण आहार, मोफत पुस्तके, गणवेश, शाळांना संगणक, आयसीटी लॅब, क्रीडा साहित्य, विज्ञान प्रयोगशाळा, डिजिटल लॅब, रोबोटिक कोडिंग लॅब आदी सुविधा पुरविण्यात येत आहेत. मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागावा यासाठी मुलींना सावित्रीबाई दत्तक पालक योजनेंतर्गत आर्थिक मदत दिली जात आहे. तरीही मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती थांबत नाही, असेही भुसे यांनी म्हटले आहे.
‘सीबीएसई’ अभ्यासक्रमात शिवाजी महाराजांचा इतिहास त्रोटक
‘सीबीएसई’ अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील इतिहास अधिक सविस्तर, अभ्यासपूर्ण असावा यासाठी केंद्र शासनाकडे राज्याचे शिष्टमंडळ घेऊन पाठपुरावा करण्यात येईल, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधान परिषदेत सांगितले. ‘सीबीएसई’ अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील इतिहासाचे लेखन अपुरे असल्याबाबत सदस्य सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत प्रश्न विचारला होता. या चर्चेत भावना गवळी, अमित गोरखे यांनी सहभाग घेतला.
‘सीबीएसई’ अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील इतिहास अपुरा आहे. या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री यांनी केंद्रीय मंत्री यांना भेटून सविस्तर व अभ्यासपूर्ण इतिहासाचा समावेश करण्याची विनंती केली आहे. पुढील काळात या संदर्भात पाठपुरावा करण्यात येऊन आवश्यक वाटल्यास केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्या भेटीसाठी शिष्टमंडळ घेऊन जाता येईल. तसेच नवीन शिक्षण धोरणानुसार अभ्यासक्रम तयार करताना राज्याचा इतिहास व भूगोल या संदर्भात सविस्तर माहिती असावी याची काळजी घेतली आहे, असेही भोयर यांनी सांगितले.