मुंबई : गणेशोत्सवात मंडळाच्या कार्यकर्त्यांना दिल्या जाणाऱ्या टी शर्टमुळे कधी एखाद्या हरवलेल्या माणसाचा शोध लागेल याची कोणी कल्पनाही केली नसेल. पण घाटकोपर येथे राहणाऱ्या विष्णु पवार यांच्याबाबतीत हे घडले आहे. वयोमानामुळे स्मृतीभ्रंश झालेले विष्णू पवार काही कामानिमित्त चिंचपोकळी परिसरात आले असता त्यांना आपल्याला कुठे जायचेय तेच आठवत नव्हते. मात्र त्यांनी घातलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या टी शर्टमुळे त्यांची पुन्हा एकदा घरच्यांशी भेट झाली.

विष्णू पवार हे घाटकोपर (प.) येथील साईनाथ चौक येथे राहतात. गेल्या आठवड्यात ते काही कामानिमित्त चिंचपोकळी येथे गेले होते. चिंचपोकळी स्थानकावर उतरल्यानंतर त्यांना आपण कुठे आहोत, आपल्याला कुठे जायचेय हेच समजत नव्हते. त्यांची अवस्था बघून काही लोकांनी त्यांना ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी विचाललेल्या प्रश्नांची त्यांना उत्तरे देता येत नव्हती. ते कुठे राहतात हे देखील त्यांना आठवत नव्हते. त्यावेळी तिथे हुकमिल लेनचा राजा या मंडळाचे पदाधिकारी सागर पाटील उपस्थित होते. त्यांनी विष्णू पवार यांनी अंगात घातलेले गणेशोत्सव मंडळाचे टी शर्ट पाहिले. पवार यांनी भीमनगरचा राजा मंडळाचे टी शर्ट घातले होते. त्यांनी पवार यांचे टी शर्टसह छायाचित्र टिपून गणेशोत्सव समन्वय समितीचे सहकार्यवाह अमित कोकोटे यांना पाठवला व संपर्क साधून या मंडळात कोणी ओळखीचे आहे का विचारणा केली.

समितीचे आणखी एक सहकार्यवाहक ओंकार सावंत यांच्या ओळखीचे एक जण भीमनगरचा राजा मंडळाचे पदाधिकारी होते. मग सावंत यांनी भीमानगरचा राजा मंडळाचे पदाधिकारी अमित म्हाडलेकर यांना पवार यांचे छायाचित्र पाठवले. तेव्हा छायाचित्रातील व्यक्ती ही मंडळातील कार्यकर्त्याचे वडील असल्याचे म्हाडलेकर यांनी सांगितले. मग म्हाडलेकर यांनी पवार यांच्या घरी याबाबत कळवले. तेव्हा पवार यांच्या कुटुंबियांनी ना. म. जोशी पोलीस ठाण्यात येऊन त्यांना सुखरूप घरी नेले.

वडिलांची काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली होती. तेव्हापासून त्यांना नीटसे आठवत नाही. पूर्वी ते चिंचपोकळीला राहत होते. त्यामुळे त्या दिवशी बाबा चिंचपोकळीला गेले होते. केवळ मंडळाच्या टी शर्टमुळे ते सापडले, असे विष्णू पवार यांचा मुलगा तेजस पवार याने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईतील गणेशोत्सव मंडळाचे जाळे हे किती प्रभावी आहे हे या घटनेतून दिसून आल्याची भावना ओंकार सावंत यांनी व्यक्त केली. टी शर्ट अंगावर असल्यामुळे पवार यांची ओळख पटवणे शक्य झाले. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे तयार झालेले जाळे, प्रत्येक मंडळातील कार्यकर्त्याशी असणारा संपर्क यामुळे पवार यांची कुटुंबियांशी भेट होऊ शकली, असेही सावंत म्हणाले.