मुंबई: मिठी नदी गाळ घोटाळ्याचे प्रकरण अतिशय क्लिष्ट आहे. तीन वर्षाच्या तपासासाठी दीड वर्षे लागली. या प्रकरणात सामील असलेले सर्व अधिकारी, अदृश्य शक्ती, यांचा तपास करणार आहे. मिठी नदीच्या गाळात कोण कोण गुंतले होते ते सर्व बाहेर काढल्याशिवाय सरकार स्वस्त बसणार नाही, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.
मुंबईतील मिठी नदीच्या गाळ काढण्यासाठी वीस वर्षात दोन हजार कोटी रुपये लागले असतील. तरी मिठी नदीचे पाणी आणि पात्र स्वच्छ झालेले नाही. नदी गाळ उपसा कामात मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा झाला आहे. या चौकशीची व्याप्ती २००५पासून वाढवण्यात यावी अशी लक्षवेधी भाजपचे राजहंस सिंह यांनी लक्षवेधी मांडली. त्याला उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सविस्तर उत्तर दिले. मुंबई पालिकेने २००५ पासून २०२४ पर्यंत मिठी नदीतील गाळ व स्वच्छतेसाठी ३३१ कोटी ७३ लाख रुपये खर्च केले आहेत.
मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात रिकामे डंपरचे फोटो दाखवून देयके उचलली गेली आहेत. २०१६ पासून १६ लाख ७० हजार मेट्रिक टन गाळ काढला गेला आहे. हा गाळ गेला कुठे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. या प्रकरणाच्या चौकशीत आतापर्यंत दोन जणांना अटक करण्यात आली असून एकाला जामीन मंजूर झाला आहे. तर एक जण न्यायालीन कोठडीत आहे.
या प्रकरणात मोठ मोठे मासे हाती लागणार असून पालिकेतील आयुक्तांपासून तर ते लिपिकांपर्यंत सर्वांची चौकशी होणार आहे. स्थायी समिती सभापती तसेच सदस्यांची एसआयटीमार्फत चौकशी केली जाणार आहे.
यात काही अदृश्य शक्ती तसेच बाहेरून निविदा नियंत्रण करणारे आहेत. त्यांचीही चौकशी होणार आहे. एस आय टी चांगली चौकशी करीत असून चौकशी पारदर्शक होणार आहे. या प्रकरणाची चौकशी करताना गाळ कुठे गेला उंदीर कुठे गेले.हे शोधून बाहेर काढा. या घोटाळ्यात कोणालाही सोडू नका. असे आव्हान शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार ॲड. अनिल परब यांनी केले