मुंबई : मिठी नदीतील गाळ काढण्यात झालेल्या भ्रष्टाचारा बाबत गुरुवारी विधान परिषदेत तिसऱ्यांदा चर्चा उपस्थित झाली. एकाच विषयावर एकाच अधिवेशनात, एकाच सभागृहात तीन वेळा चर्चा कशी काय होऊ शकते. विरोधकांचे प्रश्न, लक्षवेधी प्रलंबित ठेवली जाते आणि सत्ताधाऱ्यांना एकाच विषयावर तीन – तीन चर्चा करण्याची मुभा का दिली जाते, असा प्रश्न अनिल परब यांनी विचारून सभापती प्रा. राम शिंदे यांची कोंडी केली.
प्रसाद लाड यांनी प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान मिठी नदी गाळ काढण्याच्या कामांत झालेल्या गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराचा प्रश्न उपस्थित केला होता. भष्टाचाऱ्यांनी गाळ, चिखल, उंदीर खाल्ले आहेत, असा आरोप केला. या चर्चेत अनिल परब, प्रवीण दरेकर, भाई जगताप यांनी चर्चेत सहभाग घेतला.
विशेष तपास पथकाने (एसआयटी) २०१२ ते २०२१ या कालावधीतील तीन लाखांहून अधिक फोटो तपासले आहेत. चौकशीत अनेक ठिकाणी काम न झाल्याचे किंवा चुकीचे काम झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये सहभागी ठेकेदारांची यादी सरकारकडे आहे. संपूर्ण प्रकरणात कोणत्याही राजकीय व्यक्तीचे संरक्षण न करता, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. काढण्यात आलेला गाळ कचराभूमीत न टाकता खासगी जागेत टाकण्यास मान्यता दिल्याने हा घोटाळा झाला आहे. तीन वर्षांत ६५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार उघड झाला असून, संबंधित प्रकरणाची चौकशी २००६ पासून सुरू करण्यात येईल, असेही मंत्री सामंत म्हणाले.
प्रवीण दरेकर यांनी एसआयटीने एक महिन्याचा कालावधीत अहवाल देण्याची मागणी केली. काळ्या यादीतील ठेकेदारांना काम का दिले. तसेच भाई जगताप यांनी ही आर्थिक संघटित गुन्हेगारी आहे. हजारो कोटींचा भ्रष्टाचार आहे. या प्रकरणी ज्यांना जामीन मिळाला आहे, त्यांच्यावर आर्थिक संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून पुन्हा अटक करावी, अशी मागणी जगताप यांनी केली.
सामंत – परब यांच्या शाब्दिक चकमक
मिठी नदी भ्रष्टाचार प्रकरणाची राजकारण न करता चौकशी झाली पाहिजे. मिठी नदीची प्रश्न २००५ पासून सुरू झाला. नदीचे रुंदीकरण, खोलीकरण झाले आहे. गाळ कुठे गेला आणि कोणकोणाच्या घशात गेला. स्थायी समितीत कोण कोण होते, तेही शोधले पाहिजे. भ्रष्टाचार करणाऱ्या कंपनीचे प्रमुख सरकारच्या पंखाखाली गेले आहेत आणि त्यांचे कर्मचारी तुरुंगात आहेत. ज्यांनी ज्यांनी गाळ खाल्ला, तो बाहेर काढा. त्यात चिखल खाणारे, उंदीर खाणारे सर्व बाहेर येतील. निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली २००५ पासून चौकशी करा, अशी मागणी परब यांनी केली.
त्याला सामंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. २००६ पासून चौकशी करू, तसे आदेश देऊ. पण, एखाद्या व्यक्तीला, समुहाला कसे संरक्षण द्यायचे हे परब यांच्याकडून शिकले पाहिजे. या प्रकरणी जे अटकेत आहे, त्यांचे कुणा सोबत संबंध आहेत. दिनो मोरिया कोण आहे, याची चौकशी झाली पाहिजे. परब यांनी कायदेशीर भाषेत संबंधितांचे संरक्षण केले आहे, असेही सामंत म्हणाले.