मुंबई : चेंबूर – जेकब सर्कल मोनोरेल मार्गिकेवर बुधवारी नव्या मोनोरेल गाड्यांची चाचणी सुरू असताना गाडीचा अपघात झाला. यात गाडीचे प्रचंड नुकसान झाले. या प्रकरणाची दखल घेत महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाने (एमएमएमओसीएल) मोनोरेल प्रकल्पातील सल्लागार आणि मोनोरेल गाड्यांची बांधणी, तसेच अत्याधुनिक कम्युनिकेशन – बेस्ड ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी) सिग्नलिंग प्रणालीच्या अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या मेधा एसएमएच रेल प्रायव्हेट लिमिटेडला तांत्रिक अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अपघात नेमका कसा झाला यासंबंधीचा हा अहवाल असणार असून यात दोषी आढळणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे.

दुर्घटनांच्या मालिकांमुळे मोनोरेल सेवा सप्टेंबरपासून अनिश्चित काळासाठी बंद असून सध्या या मार्गिकेचे अत्याधुनिकरण करण्याचे काम सुरू आहे. तर नवीन देशी बनावटीच्या मोनोरेल गाड्यांच्या चाचण्या घेण्यात येत आहेत. त्यानुसार बुधवारी सकाळी ९ दरम्यान मोनोरेल गाडीच्या चाचण्या सुरू असताना सदोष सिग्नल यंत्रणेमुळे गाडीचा मोठा अपघात झाला. यात कोणालाही इजा झाली नसल्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) सांगण्यात आले. मात्र या दुर्घटनेत दोघांना किरकोळ इजा झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात नेमका कसा झाला याचे ठोस कारणही समोर आलेले नाही.

एमएमआरडीएकडूनही यासंबंधीची माहिती देण्यात आलेली नाही. मात्र हा अपघात भीषण होता आणि यात प्रवासी असते तर त्यांच्या जीवावर बेतले असते, अशी शक्यता व्यक्त होत आहे. या अपघाताची दखल घेत मोनोरेलच्या प्रकल्प सल्लागाराला आणि मोनोरेल गाड्यांची बांधणी करणाऱ्या, तसेच आवश्यक त्या चाचण्या घेण्याची जबाबदारी असणाऱ्या मेधा एसएमएच रेल प्रायव्हेट लिमिटेडला याविषयीचा तांत्रिक अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती एमएमएमओसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अग्रवाल यांनी दिली.

बुधवारी मेधा कंपनीकडून नव्या कोऱ्या मेट्रो गाड्यांच्या चाचण्या सुरू होत्या. या चाचण्यांच्यादरम्यान वडाळा कारशेडमधून नवी गाडी बाहेर पडताना हा अपघात झाला. त्यामुळे नेमका कशामुळे अपघात झाला यासंबंधीचा तांत्रिक अहवाल सादर करण्याचे आदेश कंपनीला आणि सल्लागाराला देण्यात आले आहेत. या अहवालानंतर याप्रकरणी कारवाई केली जाणार आहे.

दरम्यान याआधी १९ ऑगस्टला अतिवजनामुळे मोनोरेल गाडी कलंडून अडकली होती. त्यावेळी गाडीचे दरवाजे तोडून ५८८ प्रवाशांना अग्निशमन दलाने सुरक्षित बाहेर काढले होते. या दुर्घटनेप्रकरणी महानगर आयुक्तांनी एमएमएमओसीएलमधील दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना निलंबित केले. तर या प्रकरणाच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या चौकशी अहवालाचीही अद्याप प्रतीक्षा आहे.