मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमआरसीएल) ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेतील मेट्रो स्थानक परिसरात २,९३१ झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. या वृक्ष लागवडीसाठी एकूण १२ कोटी १ लाख ६६ हजार १३६ रुपयांची तीन कंत्राटे देण्यात आली आहेत. कंत्राटानुसार प्रत्येक झाडामागे ४१ हजार रुपये खर्च येणार आहे.

हेही वाचा >>> ‘पीएमजीपी’ वसाहत पुनर्विकासाकडे विकासकांची पाठ; निविदेस अनेकदा मुदतवाढ देऊनही शून्य प्रतिसाद

‘मेट्रो ३’ मार्गिकेच्या कामासाठी ३३.५ किमीच्या परिसरातील झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल करावी लागली होती. झाडांच्या कत्तलीवरून मोठा वादही झाला होता. हा वाद न्यायालयात गेला आहे. दरम्यान, ‘मेट्रो ३’च्या कामासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने  आतापर्यंत ३,७७२ झाडे हटविण्यास परवानगी दिली आहे. मात्र प्रत्यक्षात ३,०९३ झाडेच हटविल्याची माहिती एमएमआरसीएलकडून देण्यात आली. तर ६७९ झाडे वाचविण्यात एमएमआरसीएलला यश आल्याचेही स्पष्ट केले आहे.  उच्च न्यायालयात एमएमआरसीएलने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचे पालन करत वृक्षारोपण करण्यात येत आहे, असे एमएमआरसीएलचे म्हणणे आहे. एमएमआरसीएलच्या वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत आता ‘मेट्रो ३’ मार्गिकेतील स्थानक परिसरात २९३१ झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा >>> ‘धारावी’साठी आणखी तीन जागांची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेट्रो स्थानकातील या वृक्षारोपणासाठी तीन कंत्राटदरांची नियुक्ती केली आहे. तीन टप्प्यांत झाडे लावण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात रोपवाटिकांमध्ये दोन हेक्टर क्षेत्रात निर्धारित कालावधीत ४६ सेंमी परिघापर्यंत झाडांची वाढ करणे, दुसऱ्या टप्प्यात रोपवाटिकांमधून या आकाराच्या झाडांचे मुंबईतील विशिष्ट ठिकाणी स्थलांतर करून स्थानक परिसरात त्यांचे रोपण करणे आणि तिसऱ्या टप्प्यात वृक्षारोपणानंतर तीन वर्षे झाडांची देखभाल करण्याची जबाबदारी कंत्राटदारावर सोपविण्यात आली आहे. या प्रक्रियेदरम्यान एखादे झाड मृत पावल्यास त्याबदल्यात नवीन झाड लावणे कंत्राटदाराला बंधनकारक आहे. या २९३१ झाडांच्या रोपण मोहिमेसाठी तीन कंत्राटे देण्यात आली आहेत. यासाठी १२ कोटी १ लाख ६६ हजार १३६ रुपयांची तीन कंत्राटे देण्यात आली आहेत. यानुसार एका झाडासाठी ४१ हजार रुपये खर्च येणार आल्याचेही एमएमआरसीएलने स्पष्ट केले आहे.  दरम्यान, काही दिवसांपूर्वी मेट्रो स्थानक परिसरातील या वृक्षारोपणासाठी आव्वाच्या सव्वा खर्च केला जात असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमात प्रसिद्ध झाले होते. मात्र हे वृत्त दिशाभूल करणारे असून एका झाडामागे ४१ हजार रुपये खर्च येत असल्याची एमएमआरसीएलने स्पष्ट केले आहे.