मुंबई : ‘दहिसर – मिरा-भाईंदर मेट्रो ९’ मार्गिकेतील कारशेड उत्तन येथील डोंगरी परिसरात बांधण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला आहे. या कारशेडच्या कामासाठी १२ हजारांहून अधिक झाडे कापावी लागणार असून हा हिरवळीचा परिसर आहे. त्यामुळे स्थानिकांनी या जागेवर कारशेड बांधण्यास तीव्र विरोध करीत जनआंदोलन उभारले आहे. स्थानिकांचा विरोध लक्षात घेता अखेर एमएमआरडीएने डोंगरी कारशेड रद्द करण्याचा विचार सुरू केला आहे. यासंबंधीचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे.
मेट्रो ९ मार्गिकेतील कारशेड सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरली आहे. या मार्गिकेतील कारशेड राई, मुर्धा, मोर्वा येथे प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र या जागेला स्थानिकांनी जोरदार विरोध केल्यानंतर राज्य सरकार आणि एमएमआरडीएने ही कारशेड उत्तन डोंगरी येथे हलविली. डोंगरी कारशेडासाठी ५९.७ हेक्टर जागा ताब्यातही घेतली. कारशेडच्या कामासाठी मेसर्स ऋत्विक आणि सोमा (संयुक्त भागीदारी) या कंपनीची नियुक्तीही करण्यात आली. या कारशेडसाठी ७०१ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या कारशेडच्या कामासाठी १२ हजार ४०० झाडे कापावी लागणार आहेत. यासाठीची कार्यवाही सुरू आहे, मात्र या वृक्षतोडीला स्थानिकांनी जोरदार विरोध केला आहे.
मिरा-भाईंदरमधील हा सर्वात मोठा हिरवळीचा भाग असून हा भाग नष्ट झाल्यास पर्यावरणाचा ऱ्हास होईल, असा मुद्दा उपस्थित करीत स्थानिकांनी कारशेड रद्द करण्यासाठी जनआंदोलन उभारले. झाडे कापण्यासाठी करण्यात आलेल्या वृक्ष सर्वेक्षणाच्या अहवालावरही स्थानिकांनी आक्षेप घेतला. झाडांचे वय जाणूनबुजून कमी दाखविण्यात आल्याचा आरोप करत यासंबंधी पर्यावरणप्रेमींनी एमएमआरडीएकडे तक्रारी केल्या आहेत.
डोंगरी कारशेडला होणारा विरोध लक्षात घेता डोंगरी कारशेड रद्द करण्याचा विचार सुरू करण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएतील विश्वसनीय सूत्रांनी दिली. स्थानिकांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर कारशेड रद्द करून पर्यायी व्यवस्था करता येईल का याचाही विचार एमएमआरडीएकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंबंधीचा अंतिम निर्णय लवकरच होण्याची शक्यताही सूत्रांनी व्यक्त केली.
