मुंबई : अटल सेतूला जोडणाऱ्या वरळी – शिवडी उन्नत रस्त्याच्या कामाअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या द्विस्तरीय पुलाच्या कामात दोन इमारती बाधित होणार आहेत. या बाधितांच्या पुनर्वसनासाठी त्यांना म्हाडाच्या माध्यमातून घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार हाजी नुरानी इमारतीतील बाधितांना ४०५ चौरस फुटांचे घर मिळणार आहे. पण बाधितांनी ४०५ चौरस फुटांचे घर अमान्य केले असून ४५० चौरस फुटांचे घर द्यावे, अशी मागणी बाधितांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) केली आहे.

वरळी-शिवडी उन्नत रस्ता प्रकल्पातील रखडलेल्या द्विस्तरीय पुलाच्या बांधकामास लवकरच सुरुवात होणार आहे. जुन्या पुलाच्या पाडकामाला सुरुवात झाली असली तरी अद्याप बाधितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. दोन इमारतीतील एकूण ८३ रहिवाशांना म्हाडाच्या माध्यमातून घरे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार ३०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांच्या बदल्यात ४०५ चौरस फुटांचे घर दिले जाणार आहे. तर ३०० चौरस फुटांवरील घरे असणाऱ्यांना ३५ टक्के अतिरिक्त क्षेत्रफळाची घरे दिली जाणार आहे. या निर्णयाप्रमाणे एमएमआरडीएने म्हाडाकडे घरांसाठी मागणी केली आहे. प्रकल्पस्थळापासून दोन किमीच्या अंतरावर घरे देण्याचाही निर्णय आहे.

एमएमआरडीएच्या मागणीप्रमाणे म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून घरांची शोधाशोध करून घरे निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर या घरांची यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. पण हाजी नुरानी इमारतीतील रहिवाशांनी मात्र ४०५ चौरस फुटांची घरे अमान्य केली आहेत. कोणत्याही मोठ्या प्रकल्पात बाधित होणाऱ्या रहिवाशांना मोठी घरे दिली जातात, अशी घरे देण्यात आलेली आहेत. मग आम्हाला छोटी घरे का देण्यात येत आहेत, असा प्रश्न हाजी नुरानी इमारतीतील रहिवाशी मुनाफ ठाकूर यांनी उपस्थितीत केला आहे.

हाजी नूरानी इमारतीतील २३ घरे १८० ते २२५ चौरस फुटांची असल्याने त्यांना ४०५ चौरस फुटांची घरे दिली जाणार आहेत. मात्र आम्हाला ४५० चौरस फुटांची घरे द्यावीत अशी मागणी रहिवाशांनी एमएमआरडीएकडे केली आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रभादेवीतच घरे मिळावीत, दोन किमीची अट काढून टाकावी, अशीही त्यांची मागणी आहे. हाजी नूरानी इमारतीतील रहिवाशांनी प्रभादेवी येथील प्रियदर्शनी या पुनर्वसित इमारतीतील घरांना पसंती दर्शवली आहे. म्हाडाच्या दुरुस्ती मंडळाला या इमारतीतील काही घरे अतिरिक्त क्षेत्रफळाच्या रुपाने विकासकांकडून उपलब्ध झाली आहेत. यापैकी ३० घरे सध्या रिकामी आहेत. यामधील २३ घरे आम्हाला द्या, अशी रहिवाशांची मागणी असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.

दरम्यान, प्रियदर्शनीमध्ये घरे रिक्त आहेत. ती घरे बाधितांना दिली जाऊ शकतात, असे याविषयी विचारणा केली असता म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे ही घरे हाजी नूरानी इमारतीमधील रहिवाशांना मिळण्याची शक्यता आहे.

एमएमआरडीएला मोजावा लागणार मोबदला

म्हाडाकडून ८३ घरे बाधितांसाठी एमएमआरडीएला उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. मात्र यासाठी एमएमआरडीएला म्हाडास योग्य तो मोबदला द्यावा लागणार आहे. या घरांसाठी नेमकी किती किंमत आकारली जाईल, किंमत निश्चितीचे धोरण काय असेल हे लवकरच स्पष्ट होईल.