मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मरीन ड्राईव्हचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नेताजी सुभाषचंद्र मार्गालगत समुद्र किनाऱ्यावर १.३ किमीच्या पट्ट्यात मरीन ड्राईव्हचे १८ मीटरपर्यंत रुंदीकरण करण्यात येणार आहे. या रुंदीकरणामुळे सहा पदीर असलेला मरीन ड्राईव्ह १२ पदरी होणार आहे. या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून लवकरच आराखडा अंतिम करून या प्रकल्पास मान्यता मिळवून कामास सुरुवात करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.
पूर्वमुक्त मार्गावर अतिजलद येणाऱ्या वाहनांना ऑरेंज गेट येथे वाहतूक कोंडीत अडकावे लागते. त्यामुळे ऑरेंज गेट येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एमएमआरडीएने ६.५ किमी लांबीचा ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह असा दुहेरी बोगदा बांधण्याचा निर्णय घेऊन या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली आहे. हा बोगदा २०२८ पर्यंत वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.
दरम्यान, हा बोगदा वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर मरीन ड्राईव्ह येथे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एमएमआरडीएने एनसीपीए ते कफ परेड दरम्यान १.७७ किमी लांबीचा सागरी पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या पुलानंतरही मरीन ड्राईव्ह येथील भविष्यातील वाहतूक कोंडी दूर करण्याकरीता उपाययोजना करणे आवश्यक होते. त्यामुळे राज्य सरकारने प्रकल्पात काही सुधारणा सुचविल्या होत्या. या सुधारणानुसार एमएमआरडीएने मरीन ड्राईव्ह विस्तारीकरणाअंतर्गत १२ पदरीकरणाचा निर्णय घेतला आहे. मरीन ड्राईव्हच्या विस्तारामुळे बोगद्यातून बाहेर पडणाऱ्या वाहनांना पुढे मुंबई सागरी किनारा मार्गावर जाणे सोपे होणार आहे. तेव्हा महत्त्वाकांक्षी अशा या मरीन ड्राईव्ह विस्तार प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याचे काम सध्या एमएमआरडीए करीत आहे.
नेताजी सुभाषचंद्र मार्गालगत समुद्र किनाऱ्यावर १.३ किमीच्या पट्ट्यात मरीन ड्राईव्ह समुद्री पदपथाचे १८ मीटर रुंदीकरण करण्यात येणार आहे. या रुंदीकरणामुळे मरीन ड्राईव्हचा रस्ता सहा पदरीवरून १२ पदरी होणार आहे. रस्त्याचे रुंदीकरण करताना समुद्र किनाऱ्याला, पदपथाला कोणताही धक्का पोहचणार, किनारी पर्यावरणाला नुकसान पोहचणार नाही याची काळजी घेतली जाणार असल्याचा दावा एमएमआरडीएने केला आहे. या प्रकल्पासाठी किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्याचे सर्वेक्षण नुकतेच चेन्नई येथील अण्णा विद्यापीठाकडून पूर्ण करण्यात आले आहे. तर पर्यावरण प्रभाव मूल्यांकनासाठी प्राथमिक माहितीही तयार करण्यात आली आहे.
तसेच अभ्यास नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीकडून हायड्रोडायनामिकसंबंधीचा अभ्यास सुरू आहे. सर्व प्रकारचा अभ्यास, आराखडा पूर्ण करून या प्रकल्पाच्या प्रस्तावास मान्यता घेऊन शक्य तितक्या लवकर प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्याचे नियोजन असल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली. मरीन ड्राईव्ह विस्ताराच्या माध्यमातून वाहतूक कोंडी दूर करणे इतकाच आमचा उद्देश नाही, तर पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडून प्रवास अतिजलद करणे हा आमचा उद्देश असल्याची प्रतिक्रिया महानगर आयुक्त डाॅ. संजय मुखर्जी यांनी दिली. तर दुहेरी बोगदा प्रकल्पामुळे आणि पुढे मरीन ड्राईव्ह विस्तारामुळे प्रवासाचा कालावधी कमी होईल.
भविष्यात मरीन ड्राईव्ह विस्ताराचे महत्त्व अधोरेखित होईल आणि ‘मुंबई इन मिनिट्स’ या आमच्या संकल्पनेला बळकटी मिळेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी दिली. मरीन ड्राईव्ह विस्तारामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक सुलभ होण्यास मदत होणार असल्याचे उपमुख्यमंत्री आणि एमएमआरडीए अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी सांगितले.