मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) अनेक मेट्रो मार्गिकांची कामे हाती घेतली आहेत. या कामांसाठी मुंबई आणि एमएमआरमधील अनेक रस्ते रस्ता रोधक उभारून बंद करण्यात आले आहे. यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत असून पावसाळ्यात आणखी गैरसोय होऊन पाणी साचण्याच्या घटना घडतात. यंदा मात्र मेट्रोच्या कामामुळे पावसाळ्यात प्रवाशांची, नागरिकांची गैरसोय होणार नाही याची योग्य ती खबरदारी घेण्यात आल्याचे सांगत एमएमआरडीएने मोठ्या संख्येने मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी रस्त्यांवर उभारलेले रस्ता रोधक (बॅरिगेटस) हटविले आहेत. ‘मेट्रो २ ब’ (अंधेरी पश्चिम – मंडाले) मार्गिकेवरील ८१ टक्के, तर ‘मेट्रो ४’ आणि ‘मेट्रो ४ अ’ (वडाळा – ठाणे -कासारवडवली – गायमूख) मार्गिकांवरील ९२ टक्के रस्ता रोधक हटवून कित्येक किमीचे रस्ते मोकळे केले आहेत.
मागील काही वर्षांपासून एमएमआरडीएच्या माध्यमातून मुंबई आणि एमएमआरमध्ये ‘मेट्रो २ ब’, ‘मेट्रो ४’, ‘मेट्रो ४ अ’सह ‘मेट्रो ५’ (ठाणे – भिवंडी, पहिला टप्पा), ‘मेट्रो ६’ (स्वामी समर्थनगर – विक्रोळी), ‘मेट्रो ९’ (दहिसर – मिरा-भाईंदर) आणि ‘मेट्रो ७ अ’ (अंधेरी पूर्व – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ) या मेट्रो मार्गिकांची कामे सुरू आहेत. कामांसाठी त्या त्या मार्गिकांवरील रस्ते, रत्यांचा काही भाग रस्ता रोधक उभारून बंद करण्यात आला आहे.
अगदी चार-पाच वर्षांपासून अनेक रस्ते रस्ता रोधकांनी व्यापले असून त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातही पावसाळ्यात या रस्ता रोधकांमुळे वाहतूक कोंडी अधिकच वाढते, तर पाणी साचण्याचे प्रकार होतात. पावसाळ्यात प्रवासी, नागरिकांची गैरसोय होते. पण आता मात्र मेट्रो मार्गिकांची कामे बऱ्यापैकी पूर्ण झाल्याने अनेक ठिकाणचे रस्ता रोधक हटवून रस्ते मोकळे करण्यात आल्याची माहिती महानगर आयुक्त डाॅ. संजय मुखर्जी यांनी दिली. पाच मेट्रो मार्गिकांवरील ८१ ते ९२ टक्के रस्ता रोधक हटविण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा पावसाळ्यात प्रवासी, नागरिकांची गैरसोय होणार नाही, असे त्यांनी सांगितले.
‘मेट्रो २ ब’ मार्गिकेत २१६६६ मीटर लांबीचे रस्ते रस्ता रोधक उभारून बंद करण्यात आले होते, आतापर्यंत त्यापैकी ८१ टक्के अर्थात १७४६७ मीटर लांबीचे रस्ते मोकळे करण्यात आले आहेत. तर ‘मेट्रो ४’, ‘मेट्रो ४ अ’मध्ये ३४४४८ मीटर इतक्या रस्त्यांवर रस्ता रोधक होते. त्यापैकी आता ३१७०६ मीटर अर्थात ९२ टक्के रस्ता रोधक हटवून रस्ते मोकळे करण्यात आले आहेत. ‘मेट्रो ५’ मार्गिकेवरील ११२५९ मीटरपैकी १०९९२ मीटर अर्थात ९८ टक्के, मेट्रो ६ मार्गिकेवरील ३००५२ मीटरपैकी २७५२७ मीटर अर्थात ८९ टक्के, तर ‘मेट्रो ९’ मार्गिकेवरल १८३०० मीटरपैकी १६५०२ मीटर अर्थात ९० टक्के रस्ता रोधक हटवून रस्ते मोकळे करण्यात आल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले. दरम्यान ‘मेट्रो ७ अ’ मार्गिकवर १९०३ मीटर रस्ते रस्ता रोधक उभारून बंद करण्यात आले होते. यापैकी ३०६ मीटर अर्थात १६ टक्के रस्ता रोधक हटविण्यात आल्याचेही एमएमएआरडीएकडून सांगण्यात आले.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ता रोधक हटवून रस्ते मोकळे करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना एमएमआरडीएने केल्या असून पावसाळ्यातील परिस्थितीसाठी एमएमआरडीए सज्ज झाली आहे. कंत्राटदारांना आवश्यक त्या सूचना देऊन साफसफाई, नालेसफाईसह अन्य कामे पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे. तर मार्गदर्शक नियमावली तयार करून तिचे पालन कंत्राटादारांना बंधनकारक करण्यात आले आहे. एकूणच पावसाळ्यातील परिस्थितीशी सामना करण्यासाठी एमएमआरडीए सज्ज झाल्याचेही एमएमआरडीएकडून सांगण्यात आले.