मुंबई : मोनोरेल मार्गिकेतील वाढत्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) चेंबूर – जेकब सर्कल मोनोरेल मार्गिकेवरील सेवा अनिश्चित काळासाठी बंद केली आहे. तर सध्या मोनोरेल सेवा अत्याधुनिक आणि सक्षम करण्याच्यादृष्टीने कामे सुरू आहेत. याच कामांचा भाग म्हणून बुधवारी सकाळी ९ वाजता नव्या कोऱ्या देशी बनावटीच्या मोनोरेल गाडीची चाचणी सुरू असताना सिग्नल यंत्रणेमधील काही समस्येमुळे संचलन नियंत्रण कक्षाला गाडीचे स्थान ओळखता आले नाही आणि गाडी रुळावरून दुसऱ्या रुळावर जाऊन समोरील बीमवर आदळली. यात गाडीचे प्रचंड नुकसान झाले असून सेवा बंद असतानाही मोनोरेल दुर्घटनांची मालिका काही संपताना दिसत नाही.
चेंबूर – जेकब सर्कल मोनोरेल मार्गिका तोट्यात असल्याने आणि त्यात मोनोरेलमध्ये सातत्याने अपघात होत असल्याने एमएमआरडीएवर प्रचंड टीका होत होती. या पार्श्वभूमीवर एमएमआरडीएने मोनोरेल सेवा अनिश्चित कालावधीसाठी बंद केली असून आता ही सेवा सक्षम आणि अत्याधुनिक करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, मोनोरेलच्या ताफ्यात देशी बनावटीच्या नवीन अंदाजे आठ गाड्या दाखल झाल्या आहेत. या गाड्यांची चाचणी करण्यात येत आहे. त्यानुसार बुधवारी सकाळी ९ च्या सुमारास नवी कोरी मोनोरेल गाडी वडाळा कारशेडमधून बाहेर पडत असताना भीषण अपघात झाला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडी चाचणीसाठी चालवण्यात येत असताना सदोष सिग्नल यंत्रणेमुळे संचलन नियंत्रण कक्षाला गाडीचे स्थान ओळखता आले नाही. गाडी वळण घेत असताना एका रुळावरून दुसऱ्या रुळावर गेली आणि गाडी समोरच्या गाईडवे बीमवर जाऊन आदळली. यात गाडीचे प्रचंड नुकसान झाले. दरम्यान, चाचणीच्या वेळी गाडीत ट्रेन कॅप्टन आणि गाडीची बांधणी करणाऱ्या कंत्राटदार कंपनीचा एक कर्मचारी होता. या दोघांपैकी कोणाला इजा झाली आहे का याची माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही.
