मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘ठाणे – कल्याण – भिवंडी मेट्रो ५’ मार्गिकेसाठी २२ गाड्या खरेदी करण्यासाठी फेब्रुवारी २०२४ मध्ये निविदा मागविल्या होत्या. अखेर दीड वर्षांनंतर एमएमआरडीएने गाड्यांच्या खरेदीसाठी कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. टिटागढ रेल सिस्टीमला हे कंत्राट देण्यात आले असून २ हजार ६४० कोटी रुपये खर्च करून मेट्रो ५ साठी २२ गाड्या खरेदी करण्यात येणार आहेत.

एमएमआरडीए मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) ३३७ किमी लांबीचे मेट्रोचे जाळे विणत आहे. यापैकी २४.४५ किमी लांबीच्या मेट्रो ५ मार्गिकेचे काम एमएमआरडीए दोन टप्प्यात करीत आहे. अंदाजे ८५०० कोटी रुपये खर्चाच्या आणि १७ स्थानकांचा समावेश असलेल्या या मार्गिकेचे काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करून ही मार्गिका सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. दरम्यान, या मार्गिकेच्या कापूरबावडी – धामणकर नाका दरम्यानच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू असून या टप्प्याचे ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. तर धामणकर नाका – कल्याण या दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरच सुरू होणार आहे.

या मार्गिकेसाठी २२ गाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. गाड्यांच्या खरेदीसाठी एमएमआरडीएने फेब्रुवारी २०२४ मध्ये निविदा काढल्या होत्या. मात्र आतापर्यंत निविदा अंतिम झाली नव्हती. अखेर दीड वर्षानंतर निविदा अंतिम झाली आहे. टीटागढ रेल सिस्टीम या कंपनीला ही निविदा देण्यात आली आहे. यासंबंधीच्या प्रस्तावाला नुकतीच एमएमआरडीएच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

कंत्राटानुसार आता कंत्राटदाराला चार वर्षांत टप्प्याटप्प्याने गाड्यांची बांधणी करून त्या एमएमआरडीएच्या ताब्यात द्याव्या लागणार आहेत. या २२ गाड्यांसाठी २ हजार ६४० रुपये खर्च येणार आहे. तसेच या गाड्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी टिटागढ रेल सिस्टीमवर असणार आहे. दरम्यान, मेट्रो ५ मार्गिकेवरील गाड्या ६ डब्यांच्या असणार आहेत. टिटागढ रेल सिस्टीम १३४ डब्यांची बांधणी करणार आहे. गाड्यांच्या खरेदीचे कंत्राट अंतिम झाले असून आता लवकरच गाड्यांच्या बांधणीला सुरुवात होईल आणि पुढील चार वर्षांत एक-एक करून २२ गाड्या (१३४ डबे) मुंबईत दाखल होतील.