मुंबई : द कपिल शर्मा शोमध्ये वारंवार मुंबईऐवजी वापरल्या जाणाऱ्या बॉम्बे शब्दावर मनसेचे अमेय खोपकर यांनी संताप व्यक्त केला आहे. शोमधील हा प्रकार बंद न केल्यास कपिल शर्मा याला कारवाईचा इशारा खोपकर यांनी दिला आहे. तसेच, याविषयी कपिल शर्मा याच्याशी अद्याप प्रत्यक्ष बोलणे झाले नसल्याचे खोपकर यांनी लोकसत्ताला सांगितले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मराठीबाबतची भूमिका नेहमीच ठाम आणि स्पष्ट राहिली आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेला सर्वोच्च स्थान मिळाले पाहिजे, यासाठी पक्ष कायम आग्रही असतो. यापूर्वी मराठीचा अपमान करणाऱ्या व्यक्तींना मनसेच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने समज दिल्याचे अनेक व्हिडिओ समाजमध्यावर वायरल झाले आहेत. दरम्यान, आता कपिल शर्मा शोमध्ये मुंबईचा बॉम्बे असा उल्लेख केल्याने मनसेकडून संताप व्यक्त केला जात आहे.
काही दिवसांपूर्वी कपिल शर्मा शोमध्ये हुमा कुरेशी ही साकिब सलीमसह मुलाखतीसाठी आली होती. त्यात अभिनेत्रीने स्वतःचा एक किस्सा सांगताना मुंबईचा बॉम्बे असा उल्लेख केला होता. त्या व्हिडिओची क्लिप खोपकर यांनी एक्स समाजमाध्यमावर टाकली आहे. ट्विटमध्ये खोपकर म्हणाले की, बॉम्बेचे मुंबई अधिकृत नामकरण होऊन ३० वर्षे झाली, तरी अजूनही बॉलिवूड मधील कपिल शर्मा शोमध्ये सेलिब्रिटी पाहुणे, दिल्लीस्थित राज्यसभा खासदार, शो अँकर आणि अनेक हिंदी चित्रपटात सर्रास बॉम्बे हा उल्लेख होत आहे. १९९५ महाराष्ट्र शासन व १९९६ मध्ये केंद्र शासनाची अधिकृत मान्यता मिळून चेन्नई, बेंगळुरू, कोलकाताच्याही आधी मुंबई झाले आहे. तरी याचा मान राखून मुंबई उल्लेख करावा हा विनंती वजा इशारा देण्यात येत आहे.
खोपकर यांनी मुंबईचे जुने नाव वापरण्याला शहराच्या ओळखीचा ‘उघड अनादर’ म्हटले असून, कपिल शर्माने हे सुरूच ठेवल्यास कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. आमच्या शहराचे नाव मुंबई आहे. बॉम्बे नाही. इतर शहरांची नावे योग्य पद्धतीने घेता. पण मुंबईबद्दल बोलताना सतत बॉम्बे असा उल्लेख करता. याचा आम्ही निषेध करत असल्याचे अमेय खोपकर यांनी सांगितले.