लोकप्रतिनिधींवरही कारवाई करा- राज ठाकरे
अनधिकृत बांधकामांना अजिबात थारा देऊ नये. उलट अशी बांधकामे करणाऱ्या बिल्डरांबरोबरच त्यांना संरक्षण देणाऱ्या नगरसेवक, आमदारांवर कारवाई झाली पाहिजे, अशी रोखठोक भूमिका मांडत याप्रकरणी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसने पुकारलेल्या ‘ठाणे बंद’मध्ये आपला पक्ष सहभागी होणार नाही, असे ‘मनसे’प्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी जाहीर केले. मात्र, अनधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांची पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणीही त्यांनी केली. अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांच्या सूचनेवरही त्यांनी टीकास्त्र सोडले.
मुंब्रा येथील अनधिकृत इमारत पडून झालेल्या दुर्घटनेनंतर ठाण्यात प्रशासनाने अनधिकृत इमारतींवर कारवाईचा बडगा उगारला. त्यामुळे मतांच्या राजकारणात फटका बसण्याची चिन्हे दिसताच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन गुरुवारी ठाणे बंद पुकारला आहे. याबाबत मनसेची भूमिका काय याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले असताना बुधवारी सायंकाळी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत अनधिकृत बांधकामे आणि त्यांना संरक्षण देणाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले.
मनसेच्या लोकप्रतिनिधींनी अनधिकृत बांधकामांना संरक्षण दिले तर त्यांना पक्षातून काढून टाकण्यात येईल, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला. मनसे आमदार रमेश पाटील यांनी अनधिकृत बांधकाम केले असेल तर तेही पाडले पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका राज यांनी यावेळी मांडली. या बंदमध्ये मनसे सहभागी होणार नाही, ठाणेकरांनीही बंदला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन राज यांनी केले. अनधिकृत इमारतींच्या बांधकामापोटी ज्यांना चिरीमिरी मिळाली तेच आता त्या बांधकामांच्या संरक्षणासाठी सरसावले आहेत. अशा इमारतींमधील माणसे मेली तरी चालतील पण एक गठ्ठा मते शाबूत राहिली पाहिजेत, अशी त्यांची प्रवृत्ती आहे. अशा धोरणातूनच मोकळय़ा जागेवर झोपडय़ा वसवल्या जातात व नंतर तेथे ‘एसआरए’ राबवतात, अशा शब्दांत राज यांनी अवैध बांधकामांच्या संरक्षणासाठी सरसावलेल्या राजकारण्यांवर हल्ला चढवला. अनधिकृत बांधकामांना नियमित करण्याच्या शरद पवार यांच्या भूमिकेचाही राज यांनी कठोर शब्दांत समाचार घेतला. किती काळ अशी अनधिकृत बांधकामे नियमित करत राहणार. तसे असेल तर ‘आदर्श’ इमारतीबाबत इतका घोळ का घातला, असा सवाल करून ते म्हणाले की, दंड आकारून ती पण नियमित करून टाका. नियमित करण्याने अनधिकृत बांधकाम करणारे मोकाट सुटतील, शहरांचा विचका करून ठेवतील. त्यामुळे अनधिकृत बांधकामे अजिबात नियमित करू नये. ती पाडूनच टाकावीत, असे राज म्हणाले.

पर्यायी व्यवस्था व्हावी
अर्थात अशा इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचा त्यात फारसा दोष नसतो. त्यांचे पैसे त्यात गेलेले असतात. त्यामुळे रहिवाशांची पर्यायी व्यवस्था करावी. त्यासाठी कशारितीने योजना राबवता येईल याबाबत आपणही दोन-चार तज्ज्ञांशी चर्चा करू आणि अहवाल तयार करून मुख्यमंत्र्यांना देऊ, असेही राज म्हणाले.

‘ठाणे बंद’चा विद्यापीठाच्या परीक्षांना फटका?
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या विविध विषयांच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षांना गुरुवारच्या ‘ठाणे बंद’चा फटका बसण्याची शक्यता आहे. ठाणे बंदमुळे या परीक्षार्थीची गैरसोय होण्याची शक्यता लक्षात घेऊन परीक्षार्थीना कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाही, याची काळजी राजकीय पक्षांनी घ्यावी असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचताना वा परत येताना कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाही, याची काळजी बंदमध्ये सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांनी घ्यावी आणि परीक्षार्थीना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.