राज्यात उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे गटातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना त्यावर भाष्य करु नका असा आदेश दिला आहे. त्यातच आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक पार पडली. यावेळी राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत स्वबळावर निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं आहे. ‘एबीपी माझा’च्या वृत्तानुसार, राज ठाकरेंनी यावेळी राजकीय घडामोडींवर भाष्य करताना अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना टोलाही लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वांद्रे येथील ‘रंगशारदा’मध्ये पार पडलेल्या बैठकीत राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना स्वबळावर लढण्याची तयारी करा असा आदेश दिला. निवडणूक लढण्यासाठी लागणारा पैसा आपण उभा करु असंही ते म्हणाले. तसंच सध्याच्या राजकारणाला लोक कंटाळले आहेत, लोक पर्याय म्हणून आपला विचार करतील, त्यामुळे सकारात्मक विचार ठेवा असं सांगत त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा अशी सूचना केली.

Shinde vs Thackeray: ठाकरे गटाला ‘धगधगती मशाल’ मिळाल्यानंतर शिंदे गटाचा मोठा निर्णय, निवडणूक आयोगाला पाठवला ई-मेल

“मी तुम्हालाच सत्तेच्या खुर्चीवर बसवणार. मी सत्तेच्या खुर्चीवर उडी मारुन बसणार नाही,” असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. लवकरच आपली सत्ता येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. शिवसेनेला सहानुभूती मिळतीये हा भ्रम आहे असंही ते म्हणाले.

उद्धव विरुद्ध शिंदे वादात राज ठाकरे ट्रोल! रात्री आठनंतर ‘गुड मॉर्निंग’ अन् देशपांडे, काळे, शालिनीताईंना आवरण्याचा सल्ला

राज ठाकरेंनी यावेळी पदाधिकाऱ्यांना सहा ‘एम’चा फॉर्म्यूला दिला. मेसेज, मेसेंजर, मनी, मसल, माईंड आणि मेकॅनिक्स या सहा ‘एम’वर लक्ष केंद्रीत करण्यास पदाधिकाऱ्यांना सांगितलं. तसंच यावेळी त्यांनी दसरा मेळाव्याचाही उल्लेख केला. ते म्हणाले “दसरा मेळावा लोकांनी ऐकलाच नाही. तिथे फक्त चिखलफेक होत होती, कोणतेही विचार मांडले नाहीत. त्यामुळे आपले सकारात्मक तसंच हिंदुत्वाचे विचार लोकांपर्यंत पोहोचवा”.

लोक मनसेना प्राधान्य देतील – बाळा नांदगावकर

बाळा नांदगावकर यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की “आजची अत्यंत महत्त्वाची बैठक होती. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक अशा अनेक शहरांमधून पदाधिकारी आले होते. राज ठाकरेंनी त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी सकारात्मक विचार ठेवून निवडणुकीच्या तयारीला लागण्यास सांगितलं आहे. महाराष्ट्रातील चिखलफेक पाहता सध्या सर्वच कंटाळले आहेत. त्यामुळे लोकांच्या आपल्याकडून अपेक्षा वाढल्या असून, आपण सकारात्मकपणे सामोरं जावू अशा सूचना त्यांनी केल्या आहेत”.

स्वबळावर निवडणूक लढवण्यासंबंधी चर्चा सुरु असून, अंधेरीच्या पोटनिवडणुकीवर अजून चर्चा झाली नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्रातील स्थिती पाहता लोक राज ठाकरेंच्या मनसेला प्राधान्य देतील असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns raj thackeray office bearers meeting eknath shinde uddhav thackeray maharashtra politics sgy
First published on: 11-10-2022 at 13:28 IST