कुलदीप घायवट

मुंबई : वंदे भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करण्यासाठी आणि उद्घाटन सोहळय़ाला हजेरी लावण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांची जमवाजमव करण्याची जबाबदारी काही संबंधित अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.  रेल्वेच्या प्रत्येक विभागातील वरिष्ठांनी एक्स्प्रेसमधून प्रवास करण्याच्या सूचना कनिष्ठ कर्मचाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर अभियंता विभागासह, अन्य विभागांतील रेल्वे कर्मचारी उद्घाटन सोहळय़ाला हजेरी लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून साईनगर आणि सोलापूर या दोन ठिकाणी ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस धावणार आहे. या एक्स्प्रेसची चाचणी अंतिम टप्प्यात असून १० फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन्ही एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. मात्र, या दिवशी दोन्ही एक्स्प्रेस प्रवाशांनी भरगच्च भरलेल्या दिसाव्यात यासाठी प्रवाशांच्या जागी रेल्वे कर्मचाऱ्यांनाच बसवण्याचे नियोजन सुरू आहे. त्यानुसार रेल्वेच्या प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांना एक्स्प्रेसमध्ये तीन – चार तास आधीच येऊन बसण्याची सूचना करण्यात आली आहे. 

‘वंदे भारत’ एक्स्प्रेसमधून प्रवास करावा, असे आवाहन रेल्वेकडून प्रवाशांना करण्यात आले होते. त्यानुसार ऑनलाइन अर्ज भरणाऱ्याला ओळखपत्र देण्यात येणार आहे. मात्र प्रवाशांकडून किती प्रतिसाद मिळेल याचा अंदाज नसल्यामुळे रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांनाच या एक्स्प्रेसमधून प्रवास करण्याची सूचना केली आहे. अभियंता विभागातील कर्मचारी, ट्रकमॅन, स्थानक व्यवस्थापक व इतर विभागातील अधिकारी- कर्मचाऱ्यांना या एक्स्प्रेसमधून प्रवास करावा लागणार आहे. वरिष्ठ विभागीय अभियंता विभागातील (उत्तर-पूर्व) २५ कर्मचारी, वरिष्ठ विभागीय अभियंता विभागातील  (दक्षिण) ५० कर्मचारी, विभागीय अभियंता विभागातील (मुख्यालय) ५० कर्मचारी, वरिष्ठ विभागीय साहित्य व्यवस्थापक विभागातील १०० कर्मचारी या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. तसेच, स्थानक व्यवस्थापकांनाही यावेळी बोलवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्मचारी बसवून ‘भार चाचणी’

कोणत्याही लोकल, एक्स्प्रेसची ‘भार चाचणी’ घेताना त्यात विटा, रेती, दगड, सिमेंट भरलेल्या गोण्या भरण्यात येतात. मात्र, वंदे भारतची ‘भार चाचणी’ परळ, माटुंगा कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांना बसवून घेण्यात आली. सोमवारी, सुमारे ८०० कर्मचाऱ्यांसह ‘भार चाचणी’ घेऊन एक्स्प्रेस घाट भागात नेऊन ‘ब्रेकिंग स्टिस्टम’ची तपासणी करण्यात आली.