मुंबई : गेल्या काही वर्षांपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेल्या मोनो आणि मेट्रो संचालन करणाऱ्या प्राधिकरणांनी आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा सादर करावा, असे निर्देश गेल्याच आठवड्यात मुंबई महापालिका प्रशासनाने दिले होते. भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास बचावकार्य कसे करावे हे निश्चित करण्यासाठी या आराखड्याची गरज भासणार आहे. मात्र या दोन्ही प्राधिकरणांनी अद्याप आपला आराखडा सादर केलेला नाही, अशी माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली.
मोनो रेल्वेच्या बाबतीत वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे मुंबईपुढील आपत्कालीन दुर्घटनांचा धोका वाढला आहे. त्याचबरोबर गेल्या काही वर्षात मेट्रो रेल्वेचेही नवनवीन मार्ग सुरू झाले आहेत. मात्र या सर्व मार्गावर कधी दुर्घटना घडल्यास बचावकार्याची दिशा कशी असेल याचा आराखडा तयार करणे ही काळाची गरज आहे.
त्यामुळे आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण या नात्याने मुंबई महापालिका प्रशासनाने गेल्या आठवड्यात मुंबई महापालिका मुख्यालयात एका बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशी संबंधित आपत्कालीन नियोजन व व्यवस्थापन अधिकाधिक प्रभावी होण्याकरिता मोनो व मेट्रो सेवा प्राधिकरणांनी त्यांच्या स्तरावरील आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांकडे सादर करावा, अशी सूचना मुंबई उपनगर जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केल्या.
आपत्कालीन व्यवस्थापनाविषयी कार्यपद्धतीची सुसज्जता वेळोवेळी तपासण्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन कवायत अर्थात ‘मॉक ड्रिल’ नियमितपणे आयोजित करावी, अशा सूचना मुंबई शहर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी दिल्या होत्या.
चेंबूर येथील भक्तीपार्क नजीक १९ ऑगस्ट २०२५ रोजी तांत्रिक कारणास्तव मोनो रेल थांबून प्रवासी अडकल्याची घटना घडली होती. या घटनेच्या अनुषंगाने आपत्कालीन परिस्थितीत विविध यंत्रणांचा प्रतिसाद आणि सजगता याबाबतच्या तयारीचा आढावा घेणारी दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणांची बैठक गेल्या आठवड्यात पार पडली. त्यावेळी हे निर्देश देण्यात आले होते. मात्र अद्याप तरी या दोन्ही प्राधिकरणांनी मुंबई महापालिकेकडे आराखडा सादर केलेला नाही, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
‘सार्वजनिक वाहतूक व्यवस्था’ ही मुंबईकरांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळेच मुंबईच्या आपत्कालीन व्यवस्थापनाचा विचार करताना इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांसोबतच मोनो व मेट्रो रेल यांचाही समग्र व स्वतंत्र विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. या बैठकीला दोन्ही जिल्ह्यांच्या आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणांचे अध्यक्ष, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, मुंबई महानगरपालिकेचे संबंधित उपायुक्त, संचालक (आपत्कालीन व्यवस्थापन) महेश नार्वेकर, आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख अधिकारी, भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईचे रवी सिन्हा प्रामुख्याने उपस्थित होते. त्याचबरोबर राज्य आपत्ती निवारण कक्ष, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन, अदानी इलेक्ट्रिसिटी, टाटा पॉवर, मुंबई पोलीस दल इत्यादींचे संबंधित अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
