मुंबई: वेव्हज परिषदेच्या पहिल्या दिवशी अभिनेता शाहरुख खान याने देशभरात विविध पद्धतीची चित्रपटगृहे वाढवण्याची गरज व्यक्त केली होती. तोच धागा पकडत चित्रपट व्यवसाय वृद्धिंगत करायचा असेल तर देशात विविध राज्यांतून तालुका, जिल्हा पातळीवर वेगवेगळ्या दर्जाची चित्रपटगृहे उपलब्ध करून द्यायला हवीत. महाराष्ट्रात कोकणासारख्या प्रांतात नवनव्या चित्रपटांवर चर्चा होते. समाजमाध्यमांवर त्यांना माहिती मिळते, मात्र तिथे चित्रपटगृहच नाहीत, तर लोक चित्रपट पाहणार कुठे? सिनेमाप्रेमींचा देश असूनही एकूण लोकसंख्येपैकी केवळ २ टक्के लोक चित्रपटगृहात येऊन चित्रपट पाहतात, अशी खंत अभिनेता आमिर खान याने व्यक्त केली.

वेव्हज परिषदेच्या दुसऱ्या दिवशी ‘स्टुडिओज ऑफ द फ्युचर : पुटिंग इंडिया ऑन वर्ल्ड स्टुडिओ मॅप’ या विषयावरील आयोजित परिसंवादात अभिनेता आमिर खानसह, निर्माते दिनेश विजन, निर्माता रितेश सिधवानी, पीव्हीआर आयनॉक्सचे अजय बिजली, अमेरिकन निर्माता चार्ल्स रोवेन आणि ‘डीएनईजी’ व्हीएफएक्स कंपनीचे नमित मल्होत्रा सहभागी झाले होते. या परिसंवादात बोलताना आमिर खानने चित्रपटगृहांमधील गुंतवणूक, ओटीटी आणि चित्रपट प्रदर्शनाचे चुकीचे समीकरण आणि परदेशांतही चित्रपट वितरणाची व्यवस्था मजबूत करणे अशा विविध मुद्यांवर विस्तृत भाष्य केले.

‘चित्रपट पाहण्याची सोयच उपलब्ध नसेल तर लोक चित्रपट पाहणारच नाहीत’, असे स्पष्ट मत व्यक्त करतानाच आमिरने भारतातील चित्रपटगृहांची संख्या आणि परदेशातील चित्रपटगृहांची संख्या यांची तुलनाही केली. ‘भारताची लोकसंख्या पाहता आपल्याकडे असलेली चित्रपटगृहांची संख्या किरकोळ आहे.

भारतापेक्षा एक तृतियांश लोकसंख्या असलेल्या अमेरिकेत ४० हजार चित्रपटगृहे आहेत. त्या तुलनेत आपल्याकडे फक्त १० हजार चित्रपटगृहे आहेत. त्या १० हजार चित्रपटगृहांपैकी निम्मी चित्रपटगृहे दक्षिणेत आहेत आणि उर्वरित चित्रपटगृहे संपूर्ण देशभरात विविध ठिकाणी विखुरलेली आहेत. म्हणजे केवळ हिंदी चित्रपटांच्या व्यवसायाचा विचार करायला झाला तर त्यांना ५ हजारच चित्रपटगृहे उपलब्ध आहेत’, अशा शब्दांत आमिरने वास्तवाकडे लक्ष वेधले.

गेल्या दशभराहून अधिक काळ आपण फक्त चित्रपटगृहांच्या समस्येशीच झगडतो आहोत, असे सांगताना देशातील अगदी छोट्या – छोट्या शहरांमधून स्वस्त तिकीट दरात चित्रपट पाहता येईल, अशा पध्दतीची चित्रपटगृहे उभारणे ही आजच्या काळाची गरज आहे. अन्यथा केवळ मोठ्या शहरांमधील बहुपडदा चित्रपटगृहांमधून व्यवसाय करायचा हे फार खर्चिक आणि अवघड काम आहे, असे स्पष्ट मत आमिरने व्यक्त केले.

तुम्हीच सांगताय… ‘आमचा चित्रपट पाहू नका’ ओटीटी प्रदर्शनामुळे चित्रपट व्यवसायावर परिणाम झाला असल्याची आमिरची टीका

आपले चित्रपट चालत का नाहीत? या विषयावर हल्ली सर्वाधिक खल होत असतो याकडे लक्ष वेधत मुळात तुमचे सध्याचे व्यवसायाचे गणितच चुकलेले आहे, असे मत आमिरने व्यक्त केले. ओटीटीमुळे चित्रपटगृहांमधून होणाऱ्या व्यवसायाला फटका बसला आहे, असे त्याने सांगितले. ‘पूर्वी एखादा मोठा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो वर्षभराने दूरचित्रवाहिन्यांवर प्रसारित केला जायचा. त्यामुळे एकतर चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघा किंवा वर्षभर प्रतीक्षा करा, हा एकच पर्याय प्रेक्षकांसमोर होता.

नंतर हे गणित आठ महिन्यांवर, मग सहा महिन्यांवर आले, पण आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ४५ दिवसांच्या आत ओटीटीवर येतो. खरेतर एक कलाकार म्हणून मी प्रामाणिकपणे माझ्या प्रेक्षकांना सांगायला हवे की माझा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. तो अमूक ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित होणार असल्याने ज्यांनी त्या वाहिनीसाठी पैसे मोजले असतील त्यांनी माझा चित्रपट पाहायला येऊ नका.

तुम्ही स्वत:च एक प्रकारे तुमच्या चित्रपटाच्या व्यवसायावर गदा आणत आहात, अशी टीका करत आमिरने चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित केल्यानंतर ओटीटीवर येण्याचा मधला काळ अत्यंत कमी असल्याचे मत व्यक्त केले. तुमचा चित्रपट चांगला आहे की नाही? हा मुद्दा नंंतर येतो, पण अशा पध्दतीने ओटीटीच्या माध्यमातून अत्यंत कमी दिवसांत घरबसल्या प्रेक्षकांना चित्रपट पाहायला मिळणार असेल तर चित्रपटगृहांमध्ये चित्रपट चालणारच नाहीत, असे त्याने स्पष्टपणे सांगितले.