मुंबई : चेंबूर – जेकब सर्कल मोनोरेल मार्गिकेवरून धावणाऱ्या दोन मोनोरेल गाड्यांचा वीजपुरवठा मंगळवारी अचनाक खंडीत होऊन गाड्या बंद पडल्या. म्हैसर काॅलनी मोनोरेल स्थानकानजीक सायंकाळी एक मोनोरेल गाडी काहीशी कलंडली आणि वीजपुरवठा खंडीत होऊन बंद पडली. त्यानंतर काही वेळाने वडाळा मोनोरेल स्थानकानजीक मोनोरेल गाडीही वीजपुरवठा खंडीत झाल्याने बंद पडली.

म्हैसूर काॅलनी स्थानकानजीक अडकलेली गाडी दुसऱ्या मोनोरेल गाडीने खेचून नेण्यात महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळ मर्यादीतला (एमएमएमओसीएल) यश न आल्याने जवळपास दीड तास प्रवासी बंद गाडीत अडकले होते. प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. शेवटी अग्निशमन दलाने गाडीचा दरवाजा तोडून ५८८ प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. तर वडाळा मोनोरेल स्थानकानजीक अडकलेली गाडी दुसऱ्या मोनोरेल गाडीने खेचून वडाळा स्थानकात नेऊन प्रवाशांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले.

या गाडीत ५६६ प्रवासी होते. दोन्ही गाडीतून ११०० हून अधिक प्रवाशांची सुटका करण्यात आली. तर तांत्रिक बिघाडाचे खापर एमएमएमओसीएल आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मोठ्या प्रमाणावर झालेल्या गर्दीवर फोडले. दोन्ही गाडीमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी चढल्याने तांत्रिक बिघाड झाल्याचे एमएमएमओसीएल आणि एमएमआरडीएकडून सांगण्यात येत आहे.

चेंबूर – जेकब सर्कल मार्गिकेवर धावणाऱ्या अनेक गाड्यांमध्ये हाताच्या बोटावर मोजण्याइतके प्रवासी असतात. पण मंगळवारी मात्र मुसळधार पावसामुळे मोनोरेल स्थानकांत प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली. हार्बर रेल्वे सेवा बंद पडल्याने प्रवाशांनी मोनोरेलचा पर्याय निवडला. त्यामुळे दिवसभर मोनोरेल गाड्यांमध्ये मोठी गर्दी होती. सायंकाळी म्हैसूर काॅलनी मोनोरेल स्थानकाजवळा एक गाडी अचानक काहीशी कलंडली आणि वीजपुरवठा खंडीत होऊन बंद पडली. त्यानंतर वडाळा मोनोरेल स्थानकानजीक दुसरी गाडीही वीजपुरवठा खंडीत होऊन बंद पडली. पहिल्या गाडीतील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी दुसरी मोनोरेल गाडी आणण्यात आली, एमएमएमओसीएलला ही गाडी दुसऱ्या गाडीने खेचून नेण्यात यश आले नाही.

त्यामुळे बराच वेळ प्रवासी बंद गाडीत अडकले होते. गाडीत ५८८ प्रवासी होते. त्यामुळे प्रवासी गुदमरले. काही प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे काही प्रवाशांनी काच फोडली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता अग्निशमन दलाचे जवान क्रेनच्या साह्याने गाडीपर्यंत पोहोचले आणि त्यांनी गाडीचा दरवाजा तोडून प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. सव्वातासानंतर पहिला प्रवासी गाडीतून बाहेर आला. ज्यांना अधिक त्रास होत होता त्यांना प्राधान्याने बाहेर काढण्यात आले. त्यानुसार एक-एक करून या गाडीतून ५८८ प्रवाशांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती एमएमएमओसीएलने दिली. वडाळा स्थानकानजीकची गाडी दुसऱ्या मोनोरेल गाडीने खेचून स्थानकात नेण्यात आली.

दुसरी गाडी स्थानकात नेल्यानंतर या गाडीतून ५६६ प्रवाशांना बाहेर काढण्यात आल्याचेही एमएमओसीएलने सांगितले. पहिल्या गाडीतून बाहेर काढण्यात आलेल्या काही प्रवाशांना अधिक त्रास होत होता. त्यांना तातडीने पालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारानतंर प्रवाशांना घरी पाठविण्यात आले, तर एका महिला प्रवाशाला केईएम रुग्णालयात नेण्यात आले.

मोनोरेलमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्यामुळे ही घटना घडल्याचे एमएमएमओसीएल आणि एमएमआरडीएकडून सांगितले जात आहे. मात्र या प्रकल्पाचे लोकार्पण झाल्यापासूनच मोनोरेलमध्ये दुर्घटना आणि तांत्रिक बिघाडाची मालिका सुरू आहे. २०१७ मध्ये तर मोनोरेल गाडी जळून खाक झाली होती. दरम्यान मोनोरेल गाडीची वजन पेलण्याची क्षमता १०४ मेट्रीक टन इतकी क्षमता आहे.

बंद पडलेल्या पहिल्या मोनोरेल गाडीचे वजन १०८ मेट्रीक टन होते. त्यामुळे ती कंलडली आणि बंद पडली, असे एमएमएमओसीएलकडून सांगण्यात आले. तर दुसऱ्या गाडीतही वजन वाढल्याने तीही बंद पडली, असे एमएमएमओसीएलचे म्हणणे आहे. मोनोरेल गाडीची प्रवासी क्षमता अंदाजे ५६० प्रवासी असताना दोन्ही गाडीत क्षमतेपेक्षा दहा ते पंधरा प्रवासी अधिक होते. मात्र तरीही गाड्या कशा बंद पडल्या असा प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. मोनोरेल गाड्या जुन्या झाल्या असून त्या सातत्याने बिघाडत असल्याने अशा घटना घडत असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता मोनोरेल प्रकल्पाच्या सुरक्षिततेवर, सेवेच्या दर्जावरही आता प्रश्न उपस्थित होत आहे.