मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सकाळी १० पासून आझाद मैदानामध्ये आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामध्ये राज्यभरातून मोठ्या प्रमाणात आंदोलक सहभागी झाले आहेत. मात्र प्रकृती बिघडल्याने सुमारे ४५ हून अधिक आंदोलकांना दुपारी २ पर्यंत सेंट जॉर्जेस रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. यामध्ये अंगदुखी, डोकेदुखी, हातपाय दुखणे, सर्दी असा त्शारास होत असलेल्या आंदोलकांचा त्यात समावेश आहे.

मराठा आरक्षणासाठी गुरुवारी रात्रीपासून आंदोलक आझाद मैदानावर धडकू लागले आहेत. त्यातच शुक्रवारी सकाळी मोठ्या प्रमाणात आंदोलक आझाद मैदान, सीएसएमटी, मेट्रो, चर्चगेट या परिसरात जमा झाले. शुक्रवारी सकाळी १० वाजता मनोज जरांगे आंदोलनस्थळी आल्यानंतर आंदोलनाने भव्य स्वरूप धारण केले. मात्र पोलिसांनी आंदोलकांना १० किलोमीटर दूर गाड्या उभ्या करण्यास सांगितल्याने आंदोलकांना भर पावसात चालतच आझाद मैदान गाठावे लागले.

यामुळे अनेकांना अंगदुखी, डोकेदुखी, हातपाय दुखणे, सर्दी, ताप असा त्रास होऊ लागला. त्यामुळे आझाद मैदानापासून जवळच असलेल्या सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये सकाळपासून उपचारासाठी आंदोलकांनी गर्दी केली. दुपारी २ पर्यंत जवळपास ४५ हून अधिक आंदोलकांनी बाह्यरुग्ण विभागामध्ये उपचार घेतले. या आंदोलकांवर उपचार करून त्यांना आवश्यक औषधे दिल्याची माहिती सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी दिली.