मुंबई : गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर पुनर्विकासाला आता लवकरच गती मिळणार आहे. म्हाडाचे मुंबई मंडळ आणि अदानी समुहात पुनर्विकासासंबंधी सोमवारी करार झाला. करार झाल्याने आता अदानी समुहाकडून प्रकल्पाचा आराखडा अंतिम करण्यासह विविध प्रकारच्या सर्वेक्षणाच्या कामाला वेग दिला जाणार आहे.
अंदाजे १४२ एकर जागेवर वसलेल्या मोतीलाल नगर म्हाडा वसाहतीत ३७०० सदनिका आहेत. या वसाहतीचा पुनर्विकास उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून मार्गी लावला जात आहे. पुनर्विकासाअंतर्गत येथील रहिवाशांना १३३३ चौ. फुटांचे (कार्पेट एरिया) घर मिळणार आहे. तर अनिवासी रहिवाशांना ८३३ चौ. फुटांचे (कार्पेट एरिया) क्षेत्र दिले जाणार आहे. पाच लाख ८४ हजार १०० चौ. मीटर क्षेत्रावर पुनर्वसित इमारती बांधण्यात येणार आहेत. या पुनर्विकासाअंतर्गत मुंबई मंडळाला तीन लाख ९७ हजार १०० चौ. मीटर क्षेत्रावर घरे बांधून मिळणार आहेत. या पुनर्विकासासाठी निधी उपलब्ध होत नसल्याने या प्रकल्पासाठी मंडळाने कन्स्ट्रक्शन अँड डेव्हल्पमेंट एजन्सी (सी अँड डी) अर्थात खासगी विकासकाची नियुक्ती केली आहे. त्यानुसार सी अँड डी नियुक्तीच्या निविदेत अदानी समुहाने बाजी मारली आहे. त्यामुळे अदानी समुहाच्या माध्यमातून मोतीलाल नगरचा पुनर्विकास मार्गी लावला जात आहे. निविदा अंतिम झाल्यानंतर २ मे रोजी अदानी समुहाला मुंबई मंडळाकडून इरादा पत्र देण्यात आले होते. इरादा पत्र दिल्यानंतर आता मुंबई मंडळ आणि अदानी यांच्यात पुनर्विकासासाठी करार झाला आहे.
म्हाडा भवनात सोमवारी म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल आणि अदानी प्राॅपर्टीज लिमिटेडचे संचालक प्रणव अदानी यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. यावेळी पुनर्विकासाचे एक सादरीकरणही करण्यात आले. या पुनर्विकासाअंतर्गत रहिवाशांना मोठी आणि चांगली घरे देण्याबरोबरच त्यांना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान, अदानी समुहाने मोतीलाल नगरचा आराखडा तयार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सल्लागाराची मदत घेतली आहे. मॅकेनो या नेदरलंडस्थित कंपनीच्या माध्यमातून मोतीलाल नगर पुनर्विकासाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तर लंडनस्थित ब्युरो हॅप्पोल्ड या पायाभूत सुविधा क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीकडून मोतीलाल नगर पुनर्विकासातील पायाभूत सुविधांचा आराखडा तयार करण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले. मुंबई मंडळ आणि अदानी समुहामध्ये करार झाल्याने आता प्रत्यक्ष पुनर्विकास मार्गी लावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार अदानी समुहाकडून पुनर्विकास मार्गी लावण्याच्या कामाला सुरुवात होईल.