मुंबई : पंचमौली-देवळीपाडा उदंचन जलविद्युत (धुळे/नंदुरबार) प्रकल्पासाठी हरियाणा येथील जीएससी पीएसपी महा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोमवारी आठ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला. उदचंन जलविद्युत प्रकल्पातील गुंतवणूकदारांना जलवापर आणि पर्यावरणीय मंजुरीसह इतर सर्व परवाने जलदगतीने मिळाव्यात, यासाठी राज्य सरकारकडून ‘जलदगती (फास्ट-ट्रॅक’) यंत्रणा उभारण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

यासंदर्भात शासनाच्या सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे, जीएससी पीएसपी महा प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सुमित नंदा, मुख्य विपणन अधिकारी अनुप भटनागर आदी उपस्थित होते.

राज्यात विशेषतः सह्याद्री पर्वतरांगांमध्ये उदंचन जलविद्युत प्रकल्प राबवण्यासाठी अनुकूल भौगोलिक परिस्थिती असल्याने महाराष्ट्राला मोठा फायदा मिळणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने वीजेचे ग्रीड स्थिर ठेवण्यासाठी उदंचन जलविद्युत प्रकल्प (पंप्ड स्टोरेज प्रोजेक्ट्स) धोरणालाही वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रीड स्थिरतेसाठी सुमारे एक लाख मेगावॅट क्षमतेच्या उदंचन जलविद्युत प्रकल्पांची उभारणी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या माध्यमातून महाराष्ट्रच नव्हे तर राष्ट्रीय वीज ग्रीडही स्थिर ठेवण्याची क्षमता निर्माण होईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्र आता सौरऊर्जेच्या क्षेत्रात नवा इतिहास रचत आहे. राज्य सरकारने आशियातील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प हाती घेतला आहे. त्याद्वारे शेती क्षेत्रातील संपूर्ण ऊर्जेचा गरज सौरऊर्जेद्वारे भागविण्यात येणार आहे. या प्रकल्पातून तब्बल १६ गिगावॅट इतकी सौरऊर्जा क्षमता निर्माण होणार आहे. त्यामुळे पारंपरिक ऊर्जा स्रोतांवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी होईल. सौरऊर्जा आणि उदंचन जलविद्युत प्रकल्पांमुळे महाराष्ट्र हा देशातील अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात अग्रणी ठरणार असून, पर्यावरणस्नेही आणि शाश्वत ऊर्जानिर्मितीकडे राज्याची वाटचाल होईल, असे फडणवीस यांनी नमूद केले.

आतापर्यंत ५० उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी सामंजस्य करार झाले असून ते करार प्रत्यक्षात येण्यासाठी आवश्यक कार्यवाही जलदगतीने करण्यात येत असल्याचे कपूर यांनी सांगितले. एकूण ५१ प्रकल्पांमधून ७०,३१५ मेगावॉट वीज निर्मिती अपेक्षित असून त्यामुळे ३.८३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक व १,१३,९९० इतकी रोजगार निर्मिती होणार आहे.

पंचमौली-देवळीपाडा उदंचन प्रकल्प : स्थापित वीजनिर्मिती क्षमता १५०० मेगाव़ॉट, रोजगारनिर्मिती २५००, सुमारे १९.२९ टीएमसी प्रथम व प्रतिवर्षी पुर्नभरणासाठी ३.२४ टीएमसी पाणीसाठा आवश्यक आणि त्यासाठी औद्योगिक दराने अनुक्रमे सुमारे १७६२.२१ कोटी रुपये आणि ११२८.३२ कोटी रुपये महसूल मिळणे अपेक्षित आहे.