मुंबई : शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारधारेवर आपल्या पक्षाची वाटचाल सुरू असल्याचे नेहमी ठणकावून सांगणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी व राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी दिल्लीत ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’शी संबंधित राष्ट्र सेविका समितीच्या बैठकीला हजेरी लावल्याने वाद निर्माण झाला आहे. यावरून शरद पवार गटाने टीका करताच खासदार पवार यांनी सारवासारव केली आहे.

खासदार व अभिनेत्री कंगणा रानौत यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी संघाची महिला शाखा असलेल्या राष्ट्रसेविका समितीच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी हजेरी लावली. भगवा ध्वज, डॉ. हेडगेवार, गोळवलकर आणि भारतमातेच्या तसबिरी असलेल्या या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करतानाची छायाचित्रे प्रसिद्ध झाली.

अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात भाजपबरोबर सत्तेत सहभागी असली तरी आपली पक्षाची भूमिका पुरोगामी असल्याचे वारंवार स्पष्ट केले होते. दरवर्षी हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीत महायुतीचे मंत्री व आमदार नागपूरमध्ये रा. स्व. संघाच्या रेशीमबाग मुख्यालयात हजेरी लावतात. पण अजित पवार हे भाजपबरोबर असले तरी त्यांनी व त्यांच्या पक्षाच्या आमदारांनी संघाच्या मुख्यालयात जाण्याचे आतापर्यंत टाळले आहे.

महायुतीबरोबर असले तरी निधर्मवादी अशी स्वत:ची प्रतिमा जपण्याचा अजित पवारांनी प्रयत्न केला आहे. अगदी दोनच दिवसांपूर्वी कुरेश समाजाच्या प्रश्नांच्या संदर्भात बैठक घेतली होत. त्यात गोरक्षांकडून वाहनांची तपासणी करण्यावरून काही निर्णय घेण्यात आले होते. अजित पवार स्वत:ची पुरोगामी आणि निधर्मवादी अशी स्वत:ची प्रतिमा निर्माण करीत असताना त्यांची पत्नी खासदार सूनेत्रा पवार या राष्ट्र सेविका समितीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येते.

 ‘ आपला पक्ष पुरोगामी असल्याचे सांगायचे आणि प्रत्यक्षात रा. स्व. संघाच्या कार्यक्रमांना हजेरी लावायची हा दुटप्पीपणा आहे. मंडल आयोग लागू केल्यावर कमंडल यात्रा काय होती, हा प्रश्न त्यांनी सरसंघचालकांना विचारायला हवा होता, अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाचे आमदार रोहीत पवार यांनी सूनेत्रा पवार यांच्या संघाच्या बैठकीला उपस्थिती लावल्यावर व्यक्त केली. छायाचित्रात महिला खाली बसल्या असताना संघाचे नेते ऐटीत खुर्चीत बसल्याचे दिसत असल्याबद्दलही टीका करण्यात येत आहे.

राष्ट्र सेविका समितीच्या बैठकीला उपस्थित राहिल्याबद्दल टीका होऊ लागताच खासदार सूनेत्रा पवार यांनी ‘एक्स’ समाज माध्यमातून खुलासा केला आहे. राज्यसभेच्या खासदार म्हणून महिला संघटनांच्या कामाची प्रत्यक्ष ओळख करून घेण्याची मला उत्सुकता असते. त्या बैठकीत विविध राज्यांतील महिला सहभागी होत्या. त्यांचे उपक्रम आणि कार्यपद्धती समजून घेण्यासाठीच मी तिथे गेले होते. त्या वेळी मला बोलण्यास सांगितले. मी फक्त दोन शब्दात माझी भूमिका मांडली. माझ्या या उपस्थितीचा राजकीय अर्थ काढू नये, असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी केले आहे.

पत्नी कुठे जाते हे विचारत नाही : अजित पवार

या संदर्भात अजित पवार यांना वर्धा येथे पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी यावर अधिक बोलणे टाळले. ‘बायको मिनिटा मिनिटाला कुठे जाते, ते मी विचारत नाही,’ असे पवार म्हणाले. सुनेत्रा पवार यांच्या दिल्लीतील बैठकीला उपस्थिती राहण्यामुळे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा वैचारिक गोंधळ मात्र समोर आला आहे.