मुंबई : नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुरी – आमणे दरम्यानच्या ७६ किमी लांबीच्या शेवटच्या टप्प्याचे ५ जून रोजी मोठ्या थाटामाटात लोकार्पण करण्यात आले. मात्र लोकार्पणानंतर अवघ्या काही दिवसांतच इगतपुरी – आमणे टप्प्यातील महामार्गावर शहापूर येथे मोठे खड्डे पडल्याची बाब समाज माध्यमातून समोर आली. त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या कामाच्या दर्जावरून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळावर (एमएसआरडीसी) टीका होत आहे. या टीकेनंतर अखेर एमएसआरसीला जाग आली असून विशेष पथकाने खड्डे बुजविले.
एमएसआरडीसीने नागपूर – मुंबई दरम्यान ७०१ किमी लांबीचा समृद्धी महामार्ग बांधला. या महामार्गातील नागपूर – इगतपुरी दरम्यानचा ६२५ किमी लांबीचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाला होता. तर इगतपुरी – आमणे दरम्यानचा ७६ किमी लांबीच्या शेवटच्या टप्प्याचे ५ जून रोजी लोकार्पण करण्यात आले. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्याने नागपूर – मुंबई समृद्धी महामार्ग पूर्णत सेवेत दाखल झाला असून त्यामुळे मुंबई – नागूपर प्रवास अतिजलद झाला. मात्र इगतपुरी – आमणेदरम्यानच्या टप्प्यात प्रवाशांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे. लोकार्पणानंतर अवघ्या काही दिवसातच आमणेपासून काही अंतरावर शहापूर येथे महामार्गावर खड्डे पडले. या खड्ड्यांमुळे अपघाताची भिती निर्माण झाली. या खड्याची छायाचित्रे, व्हिडिओ समोर आल्यानंतर यावरून समाज माध्यमांवर समृद्धी महामार्गाच्या कामाच्या दर्जावर टीका होऊ लागली. प्रसारमाध्यमावर यासंंबंधीचे वृत्त प्रसारित झाले. राजकीय नेत्यांनीही यावर टीका केली. त्यानंतर अखेर एमएसआरडीसीला जाग आली आणि मंगळवारी रात्री विशेष पथकाने खड्डे बुजविले, अशी माहिती एमएसआरडीसीकडून एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली.
शहापूर येथे महामार्गावरील काँक्रीट पृष्ठभागावर २५ मी मी जाडीचा डांबरी थर देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे मंगळवारी सात ठिकाणी डांबरी थर निघून खड्डे पडले. या खड्ड्यांमुळे महामार्गाचे कोणतेही नुकसान झालेले नाही. महामार्गावरील वाहतूक सुरळीत असल्याचे एमएसआरडीसीने स्पष्ट केले. मात्र त्याच वेळी सात ठिकाणी पडलेले खड्डे हे केवळ १ चौरस मीटरचे असून हे खड्डे नगण्य असल्याचेही एमएसआरडीसीने म्हटले आहे. तर विशेष पथकाने महामार्गाचा खराब झालेला भाग तातडीने दुरुस्ती केल्याचेही एमएसआरडीसीने स्पष्ट केले. दरम्यान, समृद्धीवर याआधीही अनेक ठिकाणी खड्डे पडल्याचे, भेगा पडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या कामाच्या दर्जावर सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. तर दुसरीकडे समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या मालिकाही सुरूच आहेत. त्यामुळे एमएसआरडीसीने अपघात होऊ नयेत, खड्डे पडू नयेत याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.