मंगल हनवते, लोकसत्ता

मुंबई : मुंबई मेट्रोची धाव थेट अलिबागपर्यंत जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने विरार-अलिबाग बहुद्देशीय मार्गिकेवरील नायगाव रेल्वे स्थानक ते अलिबाग अशा १३६ किमीच्या मेट्रो मार्गिकेसाठीच्या व्यवहार्यता अभ्यास सुरू केला आहे. येत्या सहा महिन्यांत मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यात येईल. या मार्गिकेवर ४० स्थानके असणार असून नवी मुंबई विमानतळ आणि जेएनपीएदेखील या  मेट्रोमुळे जोडले जातील.  विरार ते अलिबाग ही १२८ किमीची बहुउद्देशीय मार्गिका एमएसआरडीसीकडून बांधण्यात येणार आहे. या मार्गिकेसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरु असून बांधकामासाठीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही महिन्यांत नवघर ते बळवली या पहिल्या टप्प्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. या मार्गिकेत मेट्रो प्रस्तावित करण्यात आली असून २६.६० मीटर रुंदीची जागा मेट्रोसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. ही मार्गिका पूर्ण झाल्यानंतर मेट्रो बांधण्यात येईल असे सांगितले जात असतानाच आता येत्या काही काळातच मेट्रोही मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नायगाव ते अलिबाग मेट्रो मार्गिकेच्या व्यवहार्यता तपासणीला मे. मोनार्च सव्‍‌र्हेअर अँड इंजिनीयरिंग कन्सल्टंट या सल्लागार कंपनीच्या माध्यमातून सुरुवात झाली आहे. हा अभ्यास येत्या सहा महिन्यात पूर्ण होईल. मार्गिका व्यवहार्य ठरल्यास प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती एमएसआरडीसीचे मुख्य अभियंता एस.के. सुरवसे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

हेही वाचा >>> राज्यातील रखडलेल्या सात हजार गृहप्रकल्पांपैकी तीन हजार प्रकल्प पूर्ण! रेरा उपसमितीला अहवाल सादर

बहुउद्देशीय मार्गिकेवरील प्रस्तावानुसार भिवंडीतील खारगाव येथून मेट्रो सुरु होऊन पेण येथील बळवली येथे संपणार होती. मात्र आता राज्य सरकारच्या निर्देशानुसार वसई तालुक्यातील नायगाव पश्चिम रेल्वे स्थानकापासून मेट्रो सुरू होऊन अलिबाग येथपर्यंत जाईल. ही १३६ किमी लांबीची मार्गिका सेवेत दाखल झाल्यानंतर सर्वाधिक लांबीची मेट्रो ठरेल. या मार्गिकेवर ४० मेट्रो स्थानके प्रस्तावित असून त्यात वाढ होण्यात्ही शक्यता आहे. या मार्गिकेच्या कारशेडसाठी जागा शोधावी, असे निर्देशही राज्य सरकारने एमएसआरडीसीला दिले आहेत. या मार्गिकेमुळे अलिबागच्या पर्यटनाला यामुळे चालना मिळणार असून वसई, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, पनवेल, उरण, पेण आणि अलिबाग तालुक्यांचा सर्वांगीण विकास साधला जाण्याची अपेक्षा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बहुउद्देशीय मार्गिकेवरील प्रस्तावित मेट्रो मार्गिकेच्या व्यवहार्यता अभ्यासाला सुरुवात झाली आहे. हा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर चित्र स्पष्ट होईल. या मेट्रो मार्गिकेचे काम नेमके कोण करणार, हेदेखील अद्याप निश्चित झालेले नसून त्याचा निर्णय राज्य सरकार घेईल.  – अनिलकुमार गायकवाड, व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी