मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या बसगाड्यांना इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांकडून डिझेलचा पुरवठा करण्यात येतो. या दोन्ही कंपन्यांनी डिझेलवर देणाऱ्या येणाऱ्या सवलतीत प्रति लीटर ३० पैशांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिवसाला सरासरी ३.२३ लाख रुपये आणि वर्षाला सुमारे ११.८० कोटी रुपयांची बचत होणार आहे.
गेल्या ७० वर्षापेक्षा अधिक काळ एसटी महामंडळ इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्याकडून डिझेल खरेदी करीत आहे. एसटी महामंडळाला दररोज सरासरी १० कोटी ७८ लाख लिटर डिझेल लागते. या कंपन्यांकडून एसटी महामंडळाला प्रति लिटर सवलत देण्यात येते. परंतु एसटी महामंडळाने वारंवार विनंती करूनही या कंपन्यांनी अनेक वर्ष सवलतीच्या दरात बदल केला नव्हता.
राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे संबंधित कंपन्यांनी सवलत दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात तीन-चार बैठका घेण्यात आल्या. तसेच डिझेल पुरवठा करणाऱ्या इतर खासगी कंपन्यासोबतही वाटाघाटी करण्यात आल्या. स्पर्धात्मक स्तरावर निविदा काढण्याची प्रक्रिया देखील राबवण्याची तयारी करण्यात आली. या सर्वांचा परिणाम म्हणून संबंधित कंपन्यांनी सवलतीच्या दरात वाढ करण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार १ ऑगस्टपासून मूळ सवलत दरात प्रति लिटर ३० पैसे वाढ करण्याचे संबंधित कंपन्यांनी मान्य केले आहे.
सुमारे १२ कोटी रुपयांची बचत
इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्या सध्या एसटीच्या २५१ आगारातील पेट्रोल पंपावर दररोज सरासरी १० कोटी ७८ लाख लिटर डिझेलचा पुरवठा करीत आहेत. भविष्यात बसच्या संख्येत वाढ झाल्यानंतर डिझेलच्या मागणीत वाढ होणार आहे. त्यामुळे सवलतीत प्रति लिटर ३० पैसे वाढी केल्यामुळे वर्षाकाठी एसटी महामंडळाची अंदाजे १२ कोटी रुपयांची बचत होणार आहे.
एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी पैशाची बचत आणि काटकसर करणे शक्य आहे, त्या ठिकाणी ती केली पाहिजे. तसेच तिकीट विक्रीव्यतिरिक्त उत्पन्नाचे इतर स्त्रोत निर्माण करणे गरजेचे आहे. अर्थात, या दोन्ही प्रयत्नातून भविष्यात एसटी महामंडळ आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल. – प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष.