नाताळ आणि नववर्ष या निमित्ताने गोव्याकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या दरवर्षी वाढत्या श्रेणीत आहे. या खास प्रसंगानिमित्त मुंबईकरांना गोव्याला पोहोचवण्याचा विडा एसटी महामंडळाने हातात घेतला आहे. एसटी महामंडळाने २१ डिसेंबरपासून ५ जानेवारीपर्यंत मुंबई-गोवा मार्गावर वातानुकुलित शिवनेरी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या बसचे मुंबई सेंट्रल ते पणजी फेरीचे भाडे १३६२ रुपये असेल.
नाताळ आणि नववर्ष या निमित्त मुंबईतील हजारो पर्यटक गोवा आणि कोकणात जातात. या पर्यटकांना रास्त दरांत आरामदायक प्रवासाचा अनुभव देण्यासाठी मुंबई सेंट्रल-पणजी या मार्गावर शिवनेरी गाडी चालवण्यात येणार आहे. ही गाडी २१ डिसेंबरपासून रोज रात्री ८.०० वाजता मुंबई सेंट्रलहून रवाना होईल. तर कुर्ला नेहरूनगर-मैत्री पार्क-वाशी हायवे-नेरूळ-पनवेल-महाड-चिपळूण-लांजा-कणकवली-सावंतवाडी-म्हापसा या मार्गाने दुसऱ्या दिवशी सकाळी ६.४० वाजता पणजी येथे पोहोचेल. तर परतीची फेरी पणजीहून सायंकाळी ५.०० वाजता सुटून मुंबई सेंट्रल येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता पोहोचेल. या गाडीचे आरक्षण सुरू झाले असून हे आरक्षण http://www.msrtc.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.