मुंबई : धारावीचा कायापालट करण्यासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला असतानाच आता येथील वाहतूक व्यवस्थाही बळकट करण्याची गरज निर्माण झाली आहे. धारावीत मेट्रोसह वाहतूक व्यवस्थेचे विविध पर्याय उपलब्ध करण्यासाठी बहुउद्देशीय वाहतूक केंद्र (मल्टिमॉडेल ट्रान्सपोर्ट हब) तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर (एमएमआरडीए) सोपविण्यात आली आहे.
या बहुउद्देशीय वाहतूक केंद्राच्या माध्यमातून धारावीला नवी मुंबई विमानतळाबरोबर मुंबई महानगर प्रदेशातील विविध विभागांना थेट जोडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प (डीआरपी) आणि अदानी समूहाच्या नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून धारावीचा पुनर्विकास मार्गी लावला जात आहे. त्यानुसार नुकताच आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्यानुसार धारावीचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी त्यात विविध प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. पुनर्विकासाच्या अनुषंगाने भविष्यात धारावीत नागरिकांची गर्दी आणखी वाढणार आहे, कामाच्या निमित्ताने येणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. अशा वेळी धारावीतील रस्ते अपुरे पडतील. धारावीतील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्याची गरज निर्माण होणार आहे. ही बाब लक्षात घेता धारावी पुनर्विकासाच्या आराखड्यात धारावी मल्टिमॉडेल ट्रान्सपोर्ट हब प्रस्तावित करण्यात आले आहे.
‘एमएमआरडीए’कडे समन्वयाची जबाबदारी
हा प्रकल्प धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत घेण्यात आला असला तरी हा विकास कोण करणार हा प्रश्न होता. याची जबाबदारी एमएमआरडीएवर सोपवावी, अशी विनंती एका प्रस्तावाद्वारे गृहनिर्माण विभागाने नगर विकास विभागाला केली होती. या प्रस्तावास अखेर नगर विकास विभागाने मान्यता दिली आहे. त्यानुसार एमएमआरडीएची समन्वय संस्था (नोडल एजन्सी) म्हणून नियुक्ती करण्यात आली. यासंबंधीचा शासन निर्णय बुधवारी नगर विकास विभागाने जारी केला. त्यानुसार या प्रकल्पाचा आराखडा एमएमआरडीए तयार करणार आहे. या आराखड्याला मंजुरी दिल्यानंतर पुढील कार्यवाही करून हा प्रकल्प राबवण्यात येईल.
काय करणार?
●धारावीतील अंतर्गत रस्ते मजबूत करण्यावर भर.
●या प्रकल्पाद्वारे धारावीला मुंबई, एमएमआरमधील विविध विभागांशी, नवी मुंबई विमानतळाशी जोडण्याचे काम. ●रस्ते, मेट्रो, बेस्ट, रेल्वे यांसह वाहतूक व्यवस्थेचे इतर पर्याय येथे उपलब्ध करण्याचा प्रयत्न.