मुंबई : मुंबईत पावसाने जोर धरला असून पावसामुळे मुंबईतील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहे. या खड्ड्यांमुळे वाहनचालक, प्रवासी हैराण झाले असून वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. सध्या मुलुंड – ऐरोली दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालक – प्रवाशांना अशाच त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून रस्त्याची अक्षरश चाळण झाली आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांबाबत प्रवासी – वाहनचालक, स्थानिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) या रस्त्याची जबाबदारी असून एमएसआरडीसीने नियुक्त केलेल्या कंत्राटदाराने खड्डे बुजविल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी खड्डे पडत आहेत. या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याची मागणी वाहनचालक-प्रवासी, स्थानिकांनी केली आहे.
मुलुंड – ऐरोली रस्ता महत्त्वाचा असून मुलुंड – ऐरोली रस्त्यावर ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड मोठी आहे. दररोज मोठ्या संख्येने वाहने या रस्त्यावरून धावतात. या रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांना मागील महिन्याभरापासून मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महिन्याभरापासून हा रस्ता खड्डेमय झाला आहे. खड्ड्यांमुळे वाहने चालविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून अपघाताची भीती वाढली आहे. त्याचवेळी ऐरोलीमध्ये मोठ्या संख्येने शाळा असून मुलुंडमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने ऐरोलीतील शाळेत शिकतात. त्यामुळे दररोज मोठ्या संख्येने मुलुंडवरून ऐरोलीला शालेय बस येतात.
रस्त्यांची चाळण झाल्याने शालेय बस चालकांनाही मोठी कसरत करत प्रवास करावा लागतो. २० मिनिटांच्या प्रवासासाठी ३५ ते ४५ मिनिटे लागतात, अशी माहिती वाहनचालक चैतन्य चंद्रात्रे यांनी दिली. मी दररोज या रस्त्यावरून प्रवास करतो. महिनाभर या रस्त्यांवर खड्डे आहेत. खड्डे बुजवतात, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा खड्डे होतात. या खड्ड्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून या रस्त्याचे काँक्रीटीकरण करावे, अशी मागणी चंद्रात्रे यांनी केली.
याविषयी एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक-२ राजेश पाटील यांच्याकडे विचारणा केली असता, पावसाळ्यापूर्वीच मुलुंड – ऐरोली रस्ताच नव्हे, तर मुंबईतील आमच्या अखत्यारितील सर्व रस्त्यांवरील खड्डे योग्य प्रकारे बुजविण्याचे आदेश संबंधित कंत्राटदारांना दिले होते. त्यानुसार त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. मुलुंड – ऐरोली रस्त्याबाबत तक्रारी येत आहेत. त्याची दखल घेऊन या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.