मुंबई : मुंबईत स्वमालकीचे खासगी, म्हाडाचे वा इतर सरकारी योजनेतील घर असले तरीही आता मुंबईत म्हाडाचे घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी मुंबईकरांना उपलब्ध होणार आहे. दोन वा त्यापेक्षा अधिक वेळा सोडत काढूनही विकली न गेलेल्या मुंबईतील घरांची प्रथम ‘येणाऱ्या प्रथम प्राधान्य’ तत्वाने विक्री करण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबई मंडळाने घेतला आहे. त्यानुसार मंडळाने अंदाजे १०० घरे शोधून काढली असून या घरांच्या विक्रीसाठी १० दिवसांत जाहिरात प्रसिद्ध करून घरांच्या विक्रीला सुरुवात करण्यात येणार आहे. सोडतीशिवाय ही घरे विकली जाणार असून प्रथम अर्ज करून अनामत रक्कम भरणाऱ्याला घराचे वितरण केले जाणार आहेत. या घरांच्या विक्रीसाठी अनेक अटी शिथिल करण्यात येणार असल्याने इच्छुकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबई मंडळाच्या घरांना प्रचंड मागणी आहे. असे असले तरी ताडदेव आणि तुंगा पवईतील घरे महागडी असल्याने ती विकली जात नसल्याचे चित्र आहे. तर ॲन्टाॅप हिल आणि अन्य ठिकाणची घरेही काही कारणाने विकली जात नसल्याने मुंबई मंडळाचे आर्थिक नुकसान होत आहे. ही बाब लक्षात घेत म्हाडा प्राधिकरणाने नियमानुसार दोन वा त्यापेक्षा अधिक वेळा सोडत काढूनही रिक्त राहिलेल्या मुंबईतील घरांची विक्री ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्वाने करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार दिवाळीत ‘प्रथम प्राधान्य’ तत्वावरील घरांच्या विक्रीसाठी जाहिरात काढून विक्री सुरू करण्यात येणार होती. मात्र काही कारणाने दिवाळीत या प्रक्रियेला सुरुवात होऊ शकली नाही.
पण आता मात्र म्हाडा उपाध्यक्षांनी प्राधान्यक्रमाने ही प्रक्रिया पूर्ण करून घरांच्या विक्रीला सुरुवात करण्याचे आदेश मुंबई मंडळाला दिले आहेत. त्यानुसार आता संबंधित विभाग कामाला लागेल असून घरांची शोधाशोध पूर्ण झाली आहे. या योजनेत अंदाजे १०० घरे समाविष्ट होतील. यात जास्तीत जास्त २०-२५ घरांची वाढ होऊ शकते, अशी माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या घरांसाठी १० दिवसांत जाहिरात प्रसिद्ध करून घरांची ‘प्रथम प्राधान्य’ योजनेअंतर्गत विक्री सुरू करण्याचे नियोजन असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
ताडदेवमधील क्रिसेंट टाॅवर येथील सात कोटीच्या सात घरांची विक्री झालेली नाही. म्हाडाच्या सोडतीतील आतापर्यंतची ही सर्वात महागडी घरे असून या घरांना प्रतिसाद न मिळाल्याने ती ‘प्रथम प्राधान्य’ योजनेत समाविष्ट असणार आहेत. तर पवई तुंगा येथील मध्यम आणि उच्च गटातील घरांचाही यात समावेश असणार असून ही घरेही एक ते दीड कोटींची आहेत. त्याचवेळी ॲटाॅप हिलमधील अल्प उत्पन्न गटातील घरांसह अन्य घरांचा यात समावेश असणार आहे. मात्र यात उच्च आणि मध्यम गटातील घरांचाच अधिक समावेश आहे.
दरम्यान, या घरांसाठी कोणतीही सोडत निघणार नसून जो कोणी प्रथम अर्ज करून अनामत रक्कम भरेल त्याला घराचे वितरण केले जाणार आहे. तर महत्त्वाचे म्हणजे उत्पन्न गटाची मर्यादा नाही, प्राप्तिकरच्या दाखल्याची वा प्राप्तिकर विवरण पत्राची गरज नाही. केवळ आधारकार्ड, पॅनकार्ड आणि निवासाचा दाखला इतकीच कागदपत्रे इच्छुकांना सादर करावी लागतील. मात्र जर एखादे घर सामाजिक आरक्षणातील असले तर त्यासाठी अर्जदाराला जातीचे प्रमाणपत्र, जातवैधता प्रमाणपत्र सादर करावे लागले.
महत्त्वाची बाब म्हणजे मुंबई वा देशात एखाद्याचे कुठेही घर असले, म्हाडाचे मुंबईत वा राज्यात घर असले, इतर सरकारी योजनेतील घर असले तरी त्याला या योजनेअंतर्गत म्हाडाचे घर घेता येणार आहे. एकावेळी एकापेक्षा अधिक घरेही या योजनेअंतर्गत खरेदी करता येणार आहेत. तेव्हा रिक्त घरे आता ‘प्रथम प्राधान्य’ योजनेअंतर्गत तरी विकली जातात का, या योजनेला मुंबईकरांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
