मुंबई : अभियांत्रिकी पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमाच्या पहिली फेरी १५ जुलै रोजी संपली. या पहिल्या फेरीसाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी ४८ हजार ८३५ विद्यार्थ्यांनी म्हणजेच ५९.६७ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या फेरीत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याच्या संख्येतही वाढ झाली आहे.

तंत्र शिक्षण विभागाकडून राज्यातील पॉलिटेक्निक महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी १२ जुलै रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली. त्यानुसार राज्यातील ४०४ पॉलिटेक्निक महाविद्यालयांमधील १ लाख २० हजार ५७४ जागांसाठी पहिल्या फेरीमध्ये ८१ हजार ८३० विद्यार्थ्यांना जागा जाहीर करण्यात आल्या. या विद्यार्थ्यांना १३ ते १५ जुलैदरम्यान प्रत्यक्ष महाविद्यालयामध्ये जाऊन प्रवेश घेणे अपेक्षित होते. त्यानुसार ४८ हजार ८३५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यात पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३९ हजार २९६ इतकी आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या फेरीत प्रवेश निश्चित करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. गतवर्षी पॉलिटेक्निकच्या पहिल्या फेरीमध्ये ३९ हजार ७३१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. यंदा त्यामध्ये ९ हजार १०४ विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाॅलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीला १७ जुलैपासून सुरुवात होत आहे. विद्यार्थ्यांना १७ ते १९ जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमधून पसंतीक्रम नोंदवायचा आहे. त्यानंतर २१ जुलै रोजी दुसऱ्या फेरीसाठीची निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर या यादीमध्ये जागा जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना २२ ते २४ या कालावधीमध्ये प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे.